पिंपरी-चिंचवड : विधानसभा, महापालिका आणि नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणार्या भाजपने आता आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ’वन बूथ टेन यूथ’ हा उपक्रम सुरू केला असून पिंपरी-चिंचवड शहरातील 1300 मतदान केंद्रावर प्रत्येकी दहा कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाच्या सूत्रानुसार सध्या मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघ शिवसेनेकडे आहेत. हे मतदार संघ खेचून घेण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.
लांडगे, जगताप इच्छुक
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी प्रमुख नेत्यांची दिल्लीत बैठक घेतली होती. त्यामध्ये आगामी 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीत देशभरातून भाजपचे 350 खासदार निवडून आणण्याचे लक्ष त्यांनी ठेवले आहे. यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहर मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदार संघात येते. शिवसेनेचे श्रीरंग बारणे मावळचे तर शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे दोघेही खासदारकीसाठी इच्छुक आहेत. मावळ मतदार संघातून जगताप तर शिरूरमधून लांडगे भाजपकडून प्रबळ दावेदार असणार आहेत. त्यासाठी त्या दोघांनीही आत्तापासून मशागत सुरू केली आहे.
नगरसेवकांना दोन्ही आमदारांची तंबी
आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी आज (शुक्रवारी) पिंपरी पालिकेतील नगरसेवकांची बैठक घेतली. भाजपने पंडित दीनदयाळ उपाध्याय विस्तारक योजना सुरू केली आहे. ही योजना नगरसेवकांनी गांभीर्याने घ्यावी. नगरसेवकांनी पाच सप्टेंबरपर्यंत आपल्या प्रभागात बूथ गठीत करावेत. ज्यांना काम शक्य नाही. त्यांनी कार्यमुक्त व्हावे, अशी तंबी आमदारांनी नगरसेवकांना दिली आहे.
शहरात 1300 मतदान केंद्रे
पिंपरी-चिंचवड शहरात 1300 मतदान केंद्र आहेत. एका मतदान केंद्रावर दहा कार्यकर्ते देण्यात येणार आहेत. पाच सप्टेंबरपर्यंत प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागात बूथ गठीत करणे गरजेचे आहे. मतदार यादीचे एक पान एक कार्यकर्त्याला देण्यात येणार आहे. या कार्यकर्त्याने त्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. केंद्र, राज्य सरकारने केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती कार्यकर्ते नागरिकांना देणार आहेत, अशी माहिती एकनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.