मुंबई । बीकेसीमधील मैदानात शेवटची प्रचारसभा कोण घेणार यावरून सध्या शिवसेना नेते थयथयाट करत आहेत. आजकाल आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत. त्यामुळे शिवसेना करत असलेला बालहट्ट, चिल्लरपणा पुरवण्याचा आम्ही मान्य केले आहे. आम्ही आमची मोठी सभा सोमैय्याच्या मोठ्या मैदानात घेऊ, असे सांगत आशिष शेलार यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे.मुंबई महापालिका निवडणुकीची शेवटची प्रचार सभा 18 फेब्रुवारीला होणार आहे. ही प्रचारसभा बीकेसीच्या मैदानात होणार हे निश्चित होते मात्र कोणी घ्यायची यावरून सेना भाजप एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या सभेच्या परवानगीसाठी शिवसेनेने एमएमआरडीए ला 12 जानेवारीला पत्र पाठवले असून या ठिकाणी भाजपच्या सभेला परवानगी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दबाव टाकत असल्याचा आरोप शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला होता. सभेसाठी शिवसेनेला परवानगी न मिळाल्यास भाजप विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार कारण्याचा इशारा आमदार अनिल परब यांनी दिला होता. यावर बीकेसीमधील मैदान कुणाला मिळणार यासाठी सेनानेते थयथयाट करत आहेत असा टोला भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला.
11 जानेवारी रोजी आम्ही एमएमआरडीए कडे अर्ज करून सभेसाठी मैदानाची परवानगी मागितली होती. त्यानुसार परवानगीची पत्रेही आमच्याकडे असल्याचे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. मात्र बीकेसीला 18 तारखेला कोणाची सभा होणार हा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा नाही तर मैदानाचा हा खेळ माझ्याविरुद्ध खेळला गेल्याचा आरोप त्यांनी शिवसेनेवर केला. मात्र जेव्हा जेव्हा सेना माझ्याविरुद्ध गेले तेव्हा ते तोंडघशी पडले असा दावा करत आशिष शेलार यांनी आपल्याकडेच सभेसाठी पार्किंगसहित असलेल्या सर्व परवानग्या असल्याचे स्पष्ट केले.आमच्यासाठी सभेचा मार्ग सुकर आहे मात्र शिवसेना बालहट्ट करत आहे, चिल्लरपणा करत आहे असा टोला लगावत सध्या आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याने ते हट्ट पुरवू असा चिमटा त्यांनी काढला. बीकेसीपेक्षा सोमैय्या मैदान मोठे आहे. त्यामुळे लहान भावाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही 18 तारखेला सोमैय्या मैदानावर सभा घेऊ असे भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी जाहीर केले.आमच्यासाठी सभा कुठे होईल यापेक्षा मुंबईकरांचे हित महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट करत सोमैय्याच्या मोठ्या मैदानावर मोठी सभा घेऊ असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. याचसोबत भाजपच्या मोठ्या मैदानावरील मोठ्या सभेला आम्ही आमंत्रित करत आहोत असा चिमटाही शिवसेनेला काढला.
आधी माझ्याशी निपटा – आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंना आव्हान
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चर्चेसाठी दिलेल्या आव्हानवर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी उत्तर देत, आधी माझ्याशी निपटा, असे म्हणत ठाकरे यांनाच खुले आव्हान दिले आहे. ङ्गआधी माझ्याशी निपटा. जागा तुम्ही ठरवा, वेळ तुम्ही ठरवा, मी चर्चेला येतोफ अशा शब्दात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे. भाजपच्या रविवारी सकाळी झालेल्या मुंबईतील रोड शो दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे आव्हान दिले आहे. निवडणुका आल्या की यांना रोड शो सुचतात, लोकल ट्रेनने प्रवास करतात, अशा शब्दात आशिष शेलार यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रोड शोवरही टीका केली आहे.