भाजपची ‘सामना’वर बंदीची मागणी

0

मुंबई । राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणुकांच्या ४८ तासांपूर्वी आपला प्रचार बंद करणे आवश्यक आहे. सदर पक्ष कोणत्याही प्रकारच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा किंवा उमेदवारांचा प्रचार करू शकत नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवत असलेल्या शिवसेनेचे ‘सामना’ हे मुखपत्र असून त्याची छपाई निवडणुकांच्या दरम्यान करणेे म्हणजे राज्य निवडणूक आयोगाच्या नियामाचे उल्लंघन आहे असा दावा भाजपने केला आहे. यावर तत्काळ कारवाई करून ‘सामना’वर बंदी आणण्याची मागणी भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका 16 फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत आणि शिवसेना पक्षाकडून या निवडणुका लढवल्या जात असून सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे.

निवडणुकांच्या 48 तास आधी म्हणजे 14 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून हा प्रचार समाप्त होणे आवश्यक आहे. मात्र सामना या मुखपत्रातून शिवसेनेचा प्रचार अद्याप चालूच असल्याचा दावा करत शिवसेना राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे श्वेता शालिनी यांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या 16, 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी सामना वर्तमानपत्र छापण्यावर बंदी आणावी अशी मागणी त्यानी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. याचसोबत 15 फेब्रुवारी रोजी वर्तमानपत्र छापण्या विरोधात देखील निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यानी केली आहे.