भाजपची 2019 ची व्यूहरचना; तर शिवसेनेचा अल्टिमेटम

0

मुंबई । नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा जोरात असतानाच शिवसेनेनेही भाजपला हादरा देण्याची तयारी सुरु केली आहे. सोमवारी शिवसेना आमदार, खासदार आणि मंत्र्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक झाली. सरकारचे काय करायचे असा प्रश्न सध्या आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात रोज खटके उडत आहेत. सरकारवर टीका करायची एकही संधी शिवसेना सोडत नाही. दोन्ही पक्ष सत्तेत असूनही एकमेकांचे कडवे स्पर्धक आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेनेचे गड खिळखिळे करण्यासाठी तुल्यबळ उमेदवारांची जमवाजमव करण्यात भाजपने आघाडी घेतली आहे.

शिवसेना निर्णयाच्या जवळ
भाजप कडून होणार्‍या या राजकारणा वर तोडगा म्हणून आज बैठक बोलवण्यात आली. तसेच शिवसेना निर्णयाच्या जवळ आली असून, आणखी काही काळ प्रतीक्षा करा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देत शिवसेनेने भाजपला अल्टिमेटमच दिला आहे.

जाळ्यात खेचण्याचे प्रयत्न
दुसरीकडे राज्यात एकहाती सत्ता मिळविणे हे भाजपचे उद्दीष्ठ आहे. त्यादृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली आहे. विधानसभेच्या मुंबईतील सर्वच्या सर्व 36 जागा जिंकून मुंबईत ताब्यात घेण्यासाठी भाजप व्युहरचना आखत आहे. मुंबईतील अकरा विधानसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद आहे. ही ताकद खिळखिळी कशी करता येईल या दृष्टीने भाजपची चाचपणी सुरू आहे. खासदार, आमदार आणि नगरसेवकांना जाळ्यात खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यश येत असल्याची चर्चा सुरू असल्याने शिवसेना अस्वस्थ झाली असून या बैठकीत आमदार, मंत्र्यांना राज्याच्या तळागाळात पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले असून नाराज आमदारांना धीर देत निवडणूक तयारीचे आदेश देण्यात आले आहेत .

सिंह यांचा भाजपा वापर करणार
शिवसेनेचे आमदार आणि माजी महापौर सुनील प्रभू यांचा 2009 च्या विधानसभा निवडणूकीत दिंडोशी मतदार संघातून पालिकेचे तत्कालिन विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नगरसेवक राजहंस सिंह यांनी पराभव केला होता. याच मतदार संघातून प्रभू हे गेल्या विधानसभा निवडणुकीत जिंकून आले. सिंह यांना पक्षात खेचण्यात भाजपला यश आले आहे. त्यांचा रितसर भाजपात प्रवेशही झाला आहे. आता प्रभू यांना टक्कर देण्यासाठी सिंह यांचा भाजपा वापर करणार आहे.मंत्र्यांकडून कामे होत नसल्याची टीका- अणुशक्तीनगर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले विद्यमान आमदार तुकाराम काते यांनीही शिवसेनेच्या मंत्र्यांवरील आपली नाराजी उघड केली. आमदारांची कामे मंत्र्यांकडून होत नसल्याची टीका करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची नवरात्रीच्या दरम्यान भाजप प्रवेशाची चर्चा आहे. राणे भाजपामध्ये गेल्यास कोकणात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असणार्‍या शिवसेनेला त्याकडे अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. भाजप सेनेच्या जीवावर उठला- शिवसेनेचे आमदार मंत्री आणि नेते यांच्यावर नाराज होते . या नाराजीचा फायदा भाजपने घेत नाराज आमदार आणि त्यांचे मतांचे लीड बघत त्यांसाठी आपली दारे उघडी केली असून यातुन शिवसेनेच्या अस्तित्वावरचं भाजप उठली असल्यची चर्चा या बैठकीत होती.