पुणे। पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचे मंत्रिमंडळात कोणीही ऐकत नाहीत. ते केवळ नास्ता-पाणी करायलाच मुंबईत जातात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी पुण्यात केली. पक्षविस्तारासाठी राष्ट्रवादीतर्फे प्रत्येक शहरात मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. पुण्यात आयोजित मेळाव्यात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही काही सूचना केल्या आणि तंबीही दिली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार वंदना चव्हाण उपस्थित होते.
बापट-टिळक यांच्यात समन्वयाचा अभाव
पुण्याचा कारभार भाजपला सांभाळता येत नाही. पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्यात समन्वय नाही, असा टोला पवार यांनी लगावला. खासदार संजय काकडे यांचे थेट नाव न घेता पवार यांनी, सत्ताधार्यांच्या जवळच्या काही धनदांडग्यांनी जमिनी हडप केल्या तरी कारवाई होत नसल्याचा आरोप केला. आम्ही जे काम केले ते जनतेपर्यंत पोहोचवण्यात आम्हीच अपयशी झालो, अशी कबुलीही यावेळी पवार यांनी दिली. जनतेशी संवाद न साधल्यामुळे आणि केलेली कामे जनतेपर्यंत नीट पोहोचवता न आल्याने पक्षाला फटका बसला आहे. त्यामुळे आता पक्षासाठी प्रवक्ते निर्माण करायचे आहेत. संयमी प्रवक्ता हवा, असेही पवारांनी नमूद केले.
… तर तुमचा अझरुद्दीन होईल..
पुणेकरांच्या किंवा पक्षाच्या हिताच्या प्रश्नांत कोणी फिक्सिंग केले तर तुमचा अझरुद्दीन होईल. असे करणार्यांना पक्षाचे दरवाजे कायमचे बंद होतील, अशा शब्दांत पक्षविरोधी काम करणार्यांना अजित पवारांनी सज्जड दमच दिला. पदाचा उपयोग पक्षाच्या कामासाठी करा. निष्क्रिय राहिलात आणि पक्षाचे काम केले नाहीत तर त्याची गय केली जाणार नाही. आपल्याच पक्षाच्या उखळ्या-पाखळ्या कोणी काढत असतील तर त्याची क्लिप मला पाठवा तो कोणीही असला तरी त्याच्याकडे मी पाहून घेईन, अशी तंबीच पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली. तसेच सोशल मीडियाचा गैरवापर केलात तर पक्षाचा कार्यकर्ता असला तरी मी स्वत: त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करेन, असेही अजित पवार म्हणाले.