भाजपचे कीर्ती आझाद कॉंग्रेसच्या वाटेवर?

0

दरभंगा- भाजपमधून निलंबित करण्यात आलेले नेते आणि माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी २०१९ साली होणारी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी एखाद्या राष्ट्रीय पक्षाचाच विचार करु, असेही आझाद म्हणाले आहे. कीर्ती आझाद यांनी राहुल गांधींचं कौतुक केल्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे बोलले जात आहे.

राहुल गांधी हे कुशल नेतृत्व असलेले नेते आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात मला दम दिसतो, असे वक्तव्य आझाद यांनी केले. तीन वर्षांपासून मी भाजपमधून निलंबित आहे. जर पक्षाने निलंबन कायम ठेवले तर मला दुसरा पर्याय शोधावा लागेल, असा इशारा आझाद यांनी दिला. काँग्रेसमध्ये जायच्या प्रश्नावरही आझाद यांनी उत्तर दिले. भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहेत आणि मला राष्ट्रीय पक्षाकडूनच निवडणूक लढायची आहे, असे आझाद म्हणाले.

भाजप सरकार येणार नाही
२०१९ साली भाजप सरकार येणार नाही. भाजपची स्थिती खराब झाली आहे. भाजपने जनतेसाठी कोणतीही कामे केलेली नाहीत, अशी टीका कीर्ती आझाद यांनी केली आहे. तसंच शत्रुघ्न सिन्हा यांचंही आझाद यांनी कौतुक केलं. शत्रुघ्न सिन्हा जे करतायत ते योग्य आहे. शत्रुघ्न सिन्हा पटणा साहिबमधून निवडणूक लढतील, असा विश्वास आझाद यांनी व्यक्त केला.