मुंबई । मुंबई पालिकेतील घोटाळे, माफियाराज यावरून भाजपचे खा. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेविरोधात दंड थोपटले असतानाच, केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात मुंबई महापालिका पारदर्शक कारभारात देशात क्रमांक एकवर असल्याचे अर्थसंकल्पात नमूद केले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांकडून शिवसेनेवर होत असलेल्या आरोपाची हवाच निघून गेली आहे. त्यामुळे एकप्रकारे पालिका निवडणूक प्रचारात भाजपचे अरुण जेटली हेच सेनेचे स्टार प्रचारक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात मुंबई महापालिका पारदर्शक कारभारात देशात पहिल्या क्रमांकावर आल्याने आजच्या स्थायी समितीत याचे पडसाद उमटले. पालिकेच्या सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडून पालिकेच्या पारदर्शी कारभाराचे होर्डिंग्ज मुंबईत लावावीत, अशी सूचना मांडली. याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. स्वतः अर्थमंत्र्यांनीच अशाप्रकारे कबुली देऊन पालिकेच्या पारदर्शी कारभाराबाबत टीका करणार्या सर्वच नेत्यांचे दात घशात घातल्याची प्रतिक्रिया शिवसेना नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी दिली, तर घसा फोडून पालिकेच्या कारभारावर टीका करणार्या नेत्यांचा अखेर घसा बसला. त्यांनाही पारदर्शी कारभार म्हणजे काय असतो, हे दाखवून दिल्याचे सेना नगरसेवक बाळा नर आणि प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पालिका अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी आचारसंहितेमुळे असे होर्डिंग्ज लावता येणार नाहीत असे सांगितले. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन होर्डिंग्ज लावा, असे निर्देश दिले.
मुख्यमंत्री पडले तोंडघशी
केंद्र सरकारच्या 2016-17 च्या आर्थिक सर्वेक्षणात मुंबई पालिकेने पारदर्शक कारभाराबाबत पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे पादर्शकतेवर अडून बसलेले भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोंडघशी पडले आहेत. केंद्र सरकारने आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल तयार करताना पारदर्शक आणि जबाबदार कारभाराच्या आधारे देशातील शहरांना आठपैकी गुण दिले. यामध्ये मुंबई पालिकेने पैकीच्या पैकी गुण मिळवले. मुंबईसोबत हैदराबादनेही पैकीच्या पैकी गुणांची कमाई केली.
बैठकीला भाजप सदस्यांची पाठ
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांचे सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण समिती अध्यक्षा हेमांगी वरळीकर, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी अभिनंदन केले. आयुक्तांनीही ही बाब आपल्यासाठी अभिनंदनाची असून यापुढेही अशाचप्रकारे पालिकेचा कारभार पारदर्शी राहील, असा विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणजे स्थायी समितीच्या या बैठकीला भाजपचे एकही सदस्य उपस्थित नव्हते.
थेट महापौर निवडीचा मुद्दा निकाली
महापालिकांमध्ये थेट महापौर निवड व्हावी, यासाठी भाजप आग्रही आहे. मात्र, मुंबईच्या महापौरांची निवड थेट झाल्यास कारभाराचा दर्जा सुधारेल, हा भाजपचा आग्रही मुद्दा आर्थिक अहवालाने निकाली काढला आहे.
भाजपला चपराक
स्थायी समितीसह इतर समित्यांच्या कारभाराबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. परंतु, मुंबई पालिकेचा कारभार पारदर्शी असल्याचे सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातत्याने सांगितले. त्यावर आता खुद्द अर्थमंत्र्यांनीच शिक्कामोर्तब केले. देशात मोदींच्याच सुरत आणि अहमदाबाद तसेच दिल्ली, जयपूर, चंदिगडसारख्या मोठ्या महापालिकांना मागे टाकत मुंबई महानगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावला, ही अत्यंत गौरवाची बाब आहे. त्यामुळे सातत्याने पालिकेच्या कारभारावर टीका करणार्या भाजपला ही चपराक आहे.
– यशोधर फणसे, अध्यक्ष स्थायी समिती.
सोमय्यांचे मौन
महापालिकेतील घोटाळे माफियाराज यावर आक्रमकपणे बोलणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन धारण करणे पसंत केले.