2014च्या निवडणुकीनंतर भाजप नावाची प्रचंड ताकद या देशात जन्माला आली. तसेच त्याच्या आड असलेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी उचल खाल्ली. आणि सर्वापेक्षा बलवान नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे आले. यातील तिन्ही घटकांविरूध्द ब्र काढण्याची धमक विरोधकांत सोडाच, सहयोगी सत्ताधार्यांमध्ये राहिली नाही. मात्र, दिवस फिरले आणि कोणीही उठावे टपली मारून जावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. टपली खाण्यापासून पक्ष सोडाच मोदी-शहा जोडगोळीही सुटलेली नाही. निवडणुकीच्या ऐन मुहूर्तावर भाजपचे दिवस फिरले आहेत.
शिवसेनेने मागील लोकसभा निवडणुक भाजप सोबत लढविली. मात्र, विधानसभेवेळी युती तुटली. निवडणुका झाल्या. पुन्हा युती झाली. परंतू, कटुता कायम राहिली. सेनेने सत्तेत राहून भाजपवर तोफ डागण्याची संधी एकदाही दवडली नाही. हा तोफांचा मारा अव्याहत सुरूच आहे. सुरूवातीला याची टिंगल झाली. सत्तेची फळे चाखता आणि विरोधात बोलता, राजीनामे खिशात घेवून फिरतो म्हणता मग देता कधी बोला…मात्र सेना डरली नाही. सुरूवातीला भाजपने थोडी सावध भूमिका घेतली. कधी नरमाई, कधी आक्रमक पवित्रा घेवून पाहिला; पण सेनेच्या स्वभावात बदल झाला नाही. तरीही आमची युती होणार यावर भाजपचा भर राहिला. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती झाली नाही तरी भाजप एकहाती सत्ता मिळवेल असा विश्वास व्यक्त केला. नंतर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर जावून आले. त्यामुळे पुन्हा युतीची चर्चा सुरू झाली. काही दिवसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा विषय छेडून टोकायला सुरूवात केली. म्हणून हा भाजपचा विषय असून त्यांचा अजेंडा सेनेने राबवायला सुरूवात करून युतीसाठी पुरक भूमिका घेतल्याची चर्चा झाली. सगळ्या राजकीय तज्ज्ञांचे अंदाज सेनेने या घडीपर्यंत फोल ठरविले आहेत. तसेच सतत भाजपच्या कारभाराचा, दिलेल्या आश्वासनांचा हिशेब मागायला सुरूवात केली. शेवटी युती होणारच नाही असे गृहित धरून स्वतंत्र लढण्याची तयारी भाजपने तयार केली. तरीही आडून सेनेच्या नाकदुर्या काढणे थांबविलेले नाही.
आगामी लोकसभेच्या निवडणुका जवळ येतील, तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच भाजप आणि शिवसेनेच्या युतीचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्ष स्वबळाची भाषा करत आहेत. वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत, फक्त घोषणा व्हायची बाकी आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले होते. आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये भाजपवर टीका करण्याचे टाळले होते. मात्र, शनिवारी लातुर येथे झालेल्या बैठकीत ’सोबत आले तर ठीक नाही, तर पटक देंगे’ असे वक्तव्य शहा यांनी केले. ही थेट धमकी दिली. याच्या दुसर्यादिवशी शिवसेनेला पटकवणारा अजून जन्माला आला नाही आणि येणारही नाही, असा टोला ठाकरे यांनी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या अधिवेशनामध्ये दिला. एवढेच करून ते थांबले नाहीत, तर आम्हाला कोणी लेचेपेचे समजू नका. कित्येक लाटा आल्या आणि गेल्या. भरती आणि ओहोटीला आम्ही घाबरत नाही. लाटेची आम्ही वाट लावतो. काही जण काम न करता स्वत:ची टिमकी वाजवत बसतात. विश्वाहस गमावला तर युद्ध जिंकणे अशक्य होते. सरकारने राम मंदिराचा मुद्दासुद्धा जुमलाच बनवला आहे, असे ठणकावून सांगितले. अरेरे, मुंबई महापालिका निवडणुकीतही 1 जागा जादा मिळाल्याने दादा बनूनही सेनेला महापौरपद बहाल करणार्या भाजपची अवस्था अगदी केविलवाणी झाली आहे. भाजपचे नेतृत्व अगदी गावगप्पा सभेतही काँग्रेस आणि नेहरू-गांधींच्या पिढ्यांचा उध्दार करणे सोडत नाही. परंतू, सेनेच्या विरोधात चकार शब्दही काढलेला नाही. केंद्रातील एक एक घटक पक्ष साथ सोडू लागला आहे, पाच राज्यांच्या निवडणुकीत पराभव झाला आहे, राम मंदिरावरून हिंदुत्ववादी संघटना नाराज आहेत, मोदींचा करिष्मा संपला आहे…अशा या बदललेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेकडून अधिकच ताठर भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे शिवसेनेने युती करण्यासाठी बोलणी सुरू केल्यास भाजपकडून त्यांच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देण्याची तयारी आहे. विधानसभेच्या काही जास्त जागा देण्याचीही भाजपच्या नेतृत्वाकडून तयारी आहे. जानेवारी अखेरपर्यंत वाट बघू. कारण लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेची लागू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे जानेवारीनंतर निर्णय घ्यावा लागेल, अशी रणनीती भाजपने ठरविली आहे. 2009च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 119 जागा लढविल्या होत्या. त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाजप 117 आणि शिवसेना 171 असे जागांचे वाटप होत असे.
नऊ आकडा युतीला लाभदायक असल्याने असे आकडे ठरले होते. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आणखी दहा-बारा जागा जास्त मागितल्या. शिवसेनेने याआधी एकदाही न जिंकलेल्या अशा 35 जागा होत्या. त्यातील दहा किंवा बारा जागा द्या, अशी भाजपची मागणी होती. परंतु त्या जागा देण्यास शिवसेनेच्या नेतृत्वाने नकार दिला आणि युती तुटली. त्या जागा भाजपला दिल्या असत्या तर आज शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर देऊ नका, असा सबुरीचा सल्ला भाजपच्या नेत्यांना दिला आहे. तसेच शिवसेनेच्या नेतृत्वाशी संपर्क साधण्याचाही सातत्याने प्रयत्न केला आहे. देशभरातील प्रादेशिक पक्षांना संपवून ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये कमळ फुलविण्याच्या जबर महत्त्वाकांक्षेने पछाडलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष अमित शहा ही जोडगोळी परिस्थितीला शरण गेली आहे. तरीही उसने अवसान आणून शहा बोलले असले तरी आपण घाबरणार नसल्याचे ठाकरे यांनी भाषणातून दाखवून दिले. आता शिवसेनेला युतीसाठी हतबल करणे भाजपसाठी एवढे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे आता तह झाला तरी खुषीने आणि हातघाईची लढाई झाली तरी मर्जीने असाच एकूण शिवसेना नेतृत्वाचा रोख दिसतोय. राजकीय धुरीणांच्या मते लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत. तसेच, भाजप आणि शिवसेनेची लोकसभेसाठी युती होईल, पण विधानसभेसाठी होण्याची शक्यता नाही. काही का असेना 2025च्या निवडणुकीची वाट पहा असे म्हणणार्या भाजपचे दिवस 2019मध्येच फिरले आहेत. पुढे आणखी काय काय होणार आहे याची चुणूक आणखी दोन महिन्यात दिसून येईल.