भाजपचे नाराज खासदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला !

0

मुंबई : भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे हे गेल्या काही दिवसांपासून रायगड किल्ल्याच्या संवर्धनाच्या विषयावरून केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीर बोलून देखील दाखविली आहे. दरम्यान त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मातोश्रीवर जाऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेली. रायगड किल्ल्यावर परवानगी नसताना देखील रोप-वेचे काम सुरु असल्याचा आरोप रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला होता. गडावर एखाद बांधकाम करायचे असल्यास त्यासाठी अनेक नाहरकतींची आवश्यकता असते, हा नियम रोप- वे वाल्यांना लागू नाही का, असा सवाल देखील संभाजीराजे यांनी उपस्थित केला होता.

रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात खाबूगिरी आणि बाबूगिरीचा शिरकाव झाला आहे. तसेच रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणारी कामं पुरातत्व विभागाकडून रोखली जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. रोप-वे चा मनमानी कारभार असाच चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देखील संभाजीराजे यांनी दिला आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रोप वेच्या कंपनीला नोटीस पाठविली होती. सरकारच्या पुरातत्व विभागाच्या या दुटप्पी भूमिकेवर संभाजी राजे यांनी नाराजी व्यक्त केली होती.