पिंपरी-चिंचवड। महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महापालिकेच्या आठ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आठ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी कोठेच अर्ज न भरल्याने सर्वच समित्यांवर भाजपचे अध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडीची आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली असून, नव्या अध्यक्षांची नावे बुधवारी (दि. 9) अधिकृत जाहीर करण्यात येतील.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत आठ प्रभाग समित्या आहेत. प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शनिवारी दुपारी दोनपर्यंत नामनिर्देशन पत्र वितरीत करण्यात आले. त्यानंतर दुपारी तीन ते सायंकाळी पाचपर्यंत इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आले. परंतु, विहीत मुदतीत केवळ भाजपच्या उमेदवारांनीच आपली नामनिर्देशन पत्र दाखल केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकही नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने ही निवड बिनविरोध झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने एकाही समितीच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला.
केशव हनुमंत घोळवे (’अ’ प्रभाग), सचिन बाजीराव चिंचवडे (’ब’ प्रभाग), अश्विनी संतोष जाधव (’क’ प्रभाग), शशिकांत गणपत कदम (’ड’ प्रभाग), भिमाबाई पोपट फुगे (’इ’ प्रभाग, सर्व भाजप), साधना अंकुश मळेकर (’फ’ प्रभाग, अपक्ष), अभिषेक गोविंद बारणे (’ग’ प्रभाग) आणि अंबरनाथ चंद्रकांत कांबळे (’ह’ प्रभाग) यांचे एकमेव अर्ज आले आहेत. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित असून, या निवडीची बुधवारी औपचारिक घोषणा होणार आहे.
विरोधी पक्षाने केली होती टीका
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये करताना प्रत्येक प्रभागात भाजपचा अध्यक्ष होईल, याची दक्षता सत्ताधारी भाजपने घेतली असून, प्रभाग समिती स्वत:कडे ठेवण्यासाठी खेळी करण्याचा आटापिटा आहे. क्षेत्रिय कार्यालयांची रचना करताना नागरिकांचा विचार केलेला नाही. त्यामुळे नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केला होता. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात यापूर्वी सहा क्षेत्रिय कार्यालय होते. लोकसंख्या वाढ आणि नवीन प्रभागरचना झाल्यानंतर दोन क्षेत्रिय कार्यालये वाढवण्यासाठी सत्ताधार्यांनी जोर लावला होता. त्यानुसार दोन क्षेत्रिय कार्यालयांची रचना केली आहे. येत्या क्रांतिदिनापासूनच दोन कार्यालये सुरू होणार आहेत.