कोल्हापूर: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरल्याचा दावा केला जात आहे. १७ ऑक्टोंबरला खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र अजून राष्ट्रवादी आणि खडसेंकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “खडसे भाजप सोडणार ही गेल्या अनेक दिवसांपासूनची अफवा आहे. मात्र खडसे यांनी भाजपला नुकसान होईल असे कोणतेही कृत्य मी करणार नसल्याचा शब्द दिला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.” कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“स्वत: खडसे यांनी मी पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले आहे. तरीही खडसे हे राष्ट्रवादीत जाणार, ते आमदार होणार, त्यांना कृषीमंत्री पद मिळणार अशी चर्चा जे राष्ट्रवादीचे नेते करत आहेत, त्यांनाच हा प्रश्न विचारा” असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.