भाजपचे भिष्म पितामह बनणार राष्ट्रपती

0

नवी दिल्ली । नुकत्याच पार पडलेल्या देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांमधील उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रचंड बहुमताने विजय मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाने आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आगामी जुलै महिन्यात होणार्‍या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात भाजपने 8 मार्च रोजी सोमनाथ येथे एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे भिष्म पितामह लालकृष्ण अडवाणी सहभागी झाले होते. लालकृष्ण अडवाणी यांना गुरुदक्षिणा म्हणून राष्ट्रपतीपद देण्याचे संकेत या बैठकीतून मिळाले होते. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी लालकृष्ण अडवाणी यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले असल्याचे समजले जाते. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे त्याआधीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक होईल.

उत्तर प्रदेशातील निकालामुळे बदल
भाजपने 2014 मधील लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर आणल्यावर लालकृष्ण अडवाणी नाराज झाले होते. अडवाणींनी त्यावेळी विरोधही केला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर अडवाणींनी पक्ष कार्यापासून फारकत घेतली होती. त्यामुळे मोदी आणि अडवाणी यांच्यात अघोषित शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा होती. पण उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आल्यावर अडवाणींनी तलवार म्यान करत समोझात्याचे संकेत दिले.

1990 मध्ये अडवाणींनी सोमनाथपासून रथयात्रा सुरू केली. तेव्हा नरेंद्र मोदी तीन दिवस आधीच सोमनाथमध्ये दाखल झाले होते. तेव्हा मोदी अडवाणींच्या सारथ्याच्या भूमिकेत होते. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. यावेळी मोदी 8 मार्च रोजी सोमनाथला पोहचले. त्याच्या एकदिवस आधी 7 मार्चला अडवाणी सोमनाथमध्ये आले होते.

सोमनाथपासून सुरुवात
सोमनाथपासूनच नरेंद्र मोदींना राष्ट्रीय राजकारणाला सुरुवात केली होती. 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथ ते आयोध्या यात्रा केली होती. त्यावेळी आपला सारथी म्हणून अडवाणींनी मोदींना पुढे आणले होते. तेव्हापासून मोंदीचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. मोंदींना गुजरातचे मुख्यमंत्री बनवण्यात अडवाणींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीमुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी मोदींवर नाराज झाले होते. त्यावेळीही अडवाणींनी मोंदीची ठामपणे पाठराखण केली होती. 2009 मधील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने अडवाणींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणले होते. पण, त्यावेळी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा काँग्रेस आघडीने पराभव केला होता. अडवाणी राष्ट्रपती झाल्यास पंतप्रधान होण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेची भरपाई झाल्यासारखे होईल. याशिवाय, भाजपमधील जेष्ठ नेत्यांनाही समाधान मिळेल, असे बोलले जात आहे.

असा बनेल भाजपचा राष्ट्रपती
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 10,98,882 एवढे मतांचे मूल्य आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी 5 लाख 49 हजार एवढ्या मूल्यांची मते आवश्यक असतात. सध्या भाजप आणि मित्रपक्षांकडे 4.57 लाख मूल्यांची मते आहेत. त्यामुळे विजयासाठी त्यांना अजून 92 हजार मूल्यांची मते पाहिजेत. पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जिंकलेल्या जागांमधून भाजपला 96,508 मूल्यांची मते मिळतील. यातील केवळ उत्तर प्रदेशातील विधानसभेतून भाजपला 67, 600 मूल्यांची मते मिळतील. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी-तिसरी आघाडीची मते एकत्र केली तरी ती भाजप आणि मित्रपक्षांच्या जवळपास येत नाहीत. त्यामुळे देशाचा भावी प्रथम नागरिक भाजपचा असणार, हे निश्‍चित आहे.