भाजपचे लक्ष जम्मू-काश्मीर मिळविणे; अमित शहांची आज जाहीर सभा

0

नवी दिल्ली – भाजपाध्यक्ष अमित शाह आज जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. ‘पीडीपी’शी काडीमोड घेतल्यानंतर शाह यांचा पहिलाच काश्मीर दौरा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जाहीर सभेत शाह काय भूमिका मांडणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

जनसंघाचे नेते श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला शाह संबोधित करतील. आपल्या दिवसभराच्या दौऱ्यात शाह विविध गटांशी संवाद साधतील त्यात पक्ष कार्यकर्त्यांसोबतच नागरिकांचा देखील समावेश आहे. शाह यांचा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. २०१४ लोकसभा निवडणुकीवेळी राज्यातील सहापैकी तीन जागांवर विजय संपादन करता आला होता. त्यामुळे पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग भाजप फुंकण्याची शक्यता आहे.