भाजपचे लाड जिंकले, काँग्रेसचे माने हरले!

0

विरोधकांची 14 मते फोडून प्रसाद लाड 209 मतांनी विजयी

मुंबई : काँग्रेसचे माजी आमदार नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी गुरुवारी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रसाद लाड हे 209 इतक्या दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे दिलीप माने यांचा पराभव झाला. त्यांना अवघी 73 मते पडली. लाड यांना मानेंपेक्षा 136 मते अधिक मिळाली आहेत. त्यांना शिवसेना व भाजप मित्रपक्षांनी मतदान केले तर माने यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. तरीही तब्बल 14 मते फुटल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीतील ते दगाबाज कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेनेच्या आमदारांची मते फुटू नयेत यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे आमदारांवर लक्ष ठेवण्यासाठी विधानभवनात उपस्थित होते. ठाकरे यांचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही, असा टोला यावेळी नार्वेकर यांना पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी लगाविला.

ते धोकेबाज आमदार कुणाचे? काँग्रेस की राष्ट्रवादीचे?
भाजपच्या पाठिंब्यावर आमदार होऊ आणि राज्यात मंत्रिपदी येऊ असे नारायण राणे यांना वाटत असताना आणि तसे योगही जुळून आले असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधामुळे भाजपने राणे यांना उमेदवारी डावलली होती. त्यामुळे ही पोटनिवडणूक चर्चेचा विषय बनली होती. राणेंना उमेदवारी दिल्यास शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी हातमिळवणी करेल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे राणेंची उमेदवारी टळल्यानंतर भाजपने प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली होती. लाड यांना उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा जाहीर केला होता. या निवडणुकीसाठी विधानसभेत भाजपचे 122, शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी काँग्रेसचे 41, शेतकरी कामगार पक्ष व बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी तीन, अपक्ष सात, एमआयएमचे दोन, समाजवादी पक्ष, रासप, मनसे, डावे पक्ष यांचा प्रत्येकी एक आमदार आहे. त्यामुळे उमेदवाराला जिंकण्यासाठी 145चा आकडा पार करावा लागणार होता. शिवसेनेने लाड यांना पाठिंबा दिल्याने व सात अपक्षांनीही पाठिंबा दिल्याने युतीचे संख्याबळ 192 झाले होते. परंतु, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी न्यायालयाने रद्द केल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. तसेच, छगन भुजबळ व रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही कारागृहात असल्याने त्यांनाही मतदानाचा अधिकार नव्हता. त्यामुळे प्रसाद लाड यांना 191 मते मिळणे अपेक्षित असताना त्यांना प्रत्यक्षात 209 मते पडली. म्हणजेच, लाड यांनी विरोधकांची 14 मते फोडल्याचे उघडकीस आले आहेत. हे धोकेबाज आमदार कोण? याची विधानसभेत जोरदार चर्चा सुरु होती.

मिलिंद नार्वेकर हे लाड यांचे पोलिंग एजंट?
या निवडणुकीसाठी गुरुवारी झालेले मतदान व मतमोजणी अत्यंत रोचक वातावरणात पार पडली. नारायण राणेसमर्थक कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न केल्याचे उघडपणे जाहीर केले. या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मत नकाराधिकाराचा (नोटा)ही वापर करण्यात आला होता. एमआयएमचे दोन आमदार वारिस पठाण व इमियाज जलील यांनी दांडी मारली होती. तर शिवसेनेच्या आमदारांकडून दगाफटका होण्याची शक्यता पाहाता, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना विधानसभेत लक्ष ठेवण्यासाठी पाठविले होते. ठाकरे यांच्या या कृतीची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी चांगलीच खिल्ली उडविली. ठाकरे यांचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही, अशी टीका हे नेते करत होते. तरीही शिवसेनेने दिलेला पाठिंबा पाहाता प्रसाद लाड हे जास्तीत जास्त मते घेऊन या निवडणुकीत विजयी झाले. अपक्षांचा पाठिंबा व ते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचीच मते फोडली, अशी चर्चाही विधिमंडळात सुरु होती. दोन मते बाद झाल्यानंतर लाड यांना 209 तर माने यांना अवघी 73 मते पडली होती.