मुंबई: राज्यात भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून बिनसले असल्याने भाजपने सत्ता स्थापन करण्यास नकार दिला आहे. काल रविवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर जनतेने महायुतीला जनादेश दिला असताना शिवसेनेने भाजपला पाठींबा न देऊन जनादेशाचा अपमान केल्याचे आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील जनतेने सत्तेसाठी जनादेश दिला असतानाही, आम्ही विरोधी पक्षात बसू पण मित्रपक्षाशी चर्चा करणार नाही अशी भूमिका घेतल्याने भारतीय जनता पक्षाच्या अहंकाराने जनादेशाचा अपमान केला आहे, अशा शब्दांत पलटवार केला आहे. राज्यपालांनी १०५ जागा असलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी ४८ तास दिले असताना शिवसेनेला मात्र २४ तासांचीच वेळ दिली, असे म्हणत राज्यपालांनी आम्हाला अधिक वेळ देण्याची गरज होती, यावरून देखील भेदभाव झाल्याचे दिसून येते असेही राऊत म्हणाले.
राज्यपाल कोश्यारी यांनी आम्हाला अधिक वेळ देण्याची गरज होती असे सांगताना काही लोकांना राज्याला राष्ट्रपती राजवटीत ढकण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सद्सदविवेक बुद्धीने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन आपण दोन्ही पक्षांना करत असल्याचे राऊत म्हणाले.
राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश दिला असताना युतीची सत्ता राज्यात स्थापन न होण्याबाबत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर खापर फोडू नये असे राऊत म्हणाले. ही स्थिती भारतीय जनता पक्षाच्या अहंकारामुळे निर्माण झाली असल्याचे म्हणत राऊत यांनी या परिस्थितीसाठी भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. शिवेसेनेविरुद्ध मोठे षडयंत्र रचले गेले असल्याचेही ते म्हणाले.