* आ. बाळा भेगडे व भीमराव तापकीर यांनी मारला सँडविच, वेफर्सवर ताव
* सोशल मीडियावर व्हिडिओे व्हायरल; भाजपच्या उपोषणनाट्यावर टीका
पुणे/नवी दिल्ली (प्रतिनिधी)- एकदिवसीय उपोषणाआधी छोले-भटुरेवर ताव मारणार्या काँग्रेस नेत्यांवर टीका करणार्या भाजपला त्यांच्याच आमदारांनी आता अडचणीत आणलेे. उपोषणात सहभागी झालेले मावळचे आमदार बाळा भेगडे व पुण्यातील आमदार भीमराव तापकीर यांनी सँडविच, वेफर्स, बर्फीवर ताव मारत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपोषण आंदोलनाला हरताळ फासला. प्रशासकीय बैठकीत नाश्ता करतानाचा या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. उपोषणाआधी कुठेही नाश्ता करू नका किंवा छायाचित्र, सेल्फी काढू नका अशा सूचना असतानाही या दोघांनी अवघ्या अडिच तासांतच आपले उपोषण गुंडाळले. आता भाजप या आमदारांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भारतभर उपोषणासाठी जबाबदार्यांचे वाटप करण्यात आले होते. हुबळी येथे अमित शहा, दिल्ली येथे राजनाथ सिंह, धर्मेंद्र प्रधान, सुरेश प्रभू, सुषमा स्वराज, मेनका गांधी आणि मीनाक्षी लेखी, वाराणसी येथे जे. पी. नड्डा, पाटणा येथे रविशंकर प्रसाद, चेन्नई येथे नीर्मला सीतारमण, विजय गोयल, बेंगळुरू येथे प्रकाश जावडेकर यांनी उपोषणाला हजेरी लावली. दरम्यान, या उपोषणावर शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार टीका केली आहे.
शासकीय बैठकीत मारला ताव
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज वाया गेल्याच्या निषेधार्थ देशभरात भाजपचे सर्व खासदार आणि पदाधिकार्यांनी गुरूवारी लाक्षणिक उपोषण केले. पुण्यातदेखील खासदार अनिल शिरोळेंसह शहर व ग्रामीण भागातील भाजपाचे पदाधिकारी लाक्षणिक उपोषणास बसले होते. या उपोषणस्थळी आमदार बाळा भेगडे आणि आमदार भीमराव तापकीर हेदेखील उपस्थित होते. त्यानंतर ते पुणे रेल्वे स्थानकाजवळील विधानभवन येथे पालकमंत्री गिरीश बापट आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम, जलयुक्त शिवार योजनेच्या बैठकीला गेले. या बैठकीच्या वेळी सँडविच, वेफर्स आणि बर्फीची प्लेट सर्वांना देण्यात आली. त्यावेळी बाळा भेगडे आणि भीमराव तापकीर यांनी प्लेटमधील सर्व फस्त केले. हा व्हिडिओ काही मिनिटांत सर्वत्र व्हायरल झाला.
उपाशीपोटी होतो म्हणून मिठाई खाल्ली!
दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या आमदारांना विचारणा केली असता, आम्ही दोघेही सकाळपासून उपाशीपोटी होतो. त्यामुळे मिठाई समोर आल्यानंतर ती चुकीने खाऊन घेतली गेली, असे उत्तर त्यांनी दिले. काही दिवसांपूर्वी मोदी सरकारविरोधात काँग्रेसच्यावतीने देशभरात उपोषण करण्यात आले होते. उपोषणाला बसण्यापूर्वी काही नेते छोले-भटुरे खात असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नेमका हाच धागा पकडून भाजपने काँग्रेसची खिल्ली उडविली होती. असाच प्रसंग आपल्यावर ओढावू नये म्हणून भाजपने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. तरीही आ. भेगडे व आ. तापकीर यांनी सार्वजनिक ठिकाणी खाण्याचा मोह टाळलाच नाही. त्यामुळे भाजपवर चांगलीच नामुष्की ओढावली.
ही तर मोर आणि लांडोरीची स्पर्धा
काँग्रेसचे उपोषणास्त्र फसल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने एक दिवसाचा उपवास केला. ही तर जणू काही मोर आणि लांडोर यांची स्पर्धा सुरू आहे. देशातील मोठ्या वर्गाचे हाल आणि उपासमार थांबत नाहीत, त्यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत. अशात या उपवास नाट्याने काय साध्य होणार? अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.