भाजपच्या एका गटाला हवेत मुंडेच आयुक्त!

0

पिंपरी-चिंचवड : मुंबई महापालिका आयुक्तपदावरून उचलबांगडी करून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या (पीएमपीएमएल) अध्यक्ष व कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झालेले तुकाराम मुंडे यांनी अद्याप या पदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. कनिष्ठ पदावर काम करण्यास मुंडे अनुत्सुक असून, भाजपमधील एक गट त्यांना पुणे किंवा पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झालेली अतिक्रमणे, महापालिकेतील गैरप्रकार, शहराचा सुनियोजित विकास व नवीन विकासकामे धडाकेबाजपणे राबविण्यासाठी मुंडेे यांच्यासारखे धडाकेबाज अधिकारी आयुक्तपदावर हवेत, असा या गटाचा आग्रह आहे. दुसरा गट मात्र त्याला कडाडून विरोध करतो आहे. ‘उगीच अंगाला खरूज करून घेऊ नका,‘ असा सल्ला या गटाकडून दिला जात आहे.

पुणे आयुक्तपदासाठी आग्रही!
मुंडे यांच्यासारख्या कर्तव्यकठोर सनदी अधिकार्‍याची राज्य सरकारने नवी मुंबई आयुक्तपदावरून बदली केली आहे. त्यांच्या बदलीची भाजपवगळता सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती. तथापि, नव्या पदावर मुंडे स्वतः असमाधानी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच ते तातडीने पदभार घेण्यास तयार नाहीत. दुसरीकडे, पीएमपीएमएलचे अधिकारी, कर्मचारी मात्र त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. असा खमक्या अधिकारी मिळाल्याशिवाय पीएमपीएमएल नफ्यात येणार नाही, अशी या अधिकारी-कर्मचारीवर्गाची भावना आहे. दरम्यान, मुंडे यांना किमानपक्षी पुणे किंवा पिंपरी-चिंचवडचे आयुक्त तरी करावे, अशी मागणी भाजपमधील एक गट करत आहे. खुद्द मुंडेही भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याशी याबाबत बोलले आहेत, असे भाजपतील सूत्रांनी ‘जनशक्ति’शी बोलताना सांगितले. सध्या पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार आहेत. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे आहेत. वाघमारे नुकतेच या पदावर आले आहेत. त्यामुळे त्यांना वर्षही पूर्ण झालेले नाही. त्यांची बदली न करता कुणाल कुमार यांच्या जागी मुंडे यांना नेमावे, यासाठी फडणवीस यांच्याकडे एका गटाचा चांगलाच दबाव वाढलेला आहे. कुणाल कुमार यांनी पुण्याच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेऊन आता सुमारे पावणेतीन वर्षे झाली आहेत. त्यामुळे त्यांची नियमानुसार बदली होऊ शकते. भाजपचे काही आमदारही कुणाल कुमार यांच्या बदलीसाठी प्रयत्नशील असल्याचेही सांगितले जाते.

अध्यक्षपद स्वीकारण्यास अधिकारी अनुत्सुक!
पीएमपीएमएलचा पदभार अद्याप तरी तुकाराम मुंडे यांनी स्वीकारलेला नाही. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. सध्या पीएमपीएमएलचा अतिरिक्त कारभार कुणाल कुमार यांच्याकडेच आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्षपद सनदी अधिकार्‍यांना पदावनती वाटत असते. त्यामुळे चांगले अधिकारी या पदावर येण्यास तयार नाहीत. पुणे व पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्र असलेल्या या सार्वजनिक कंपनीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची कोणत्याही अधिकार्‍याची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळेच गेल्या आठ वर्षार्ंत तब्बल 10 सनदी अधिकारी या कंपनीला अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक म्हणून पाहावयास मिळालेले आहेत. यापूर्वी अभिषेक कृष्णा यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; परंतु त्यांची 8 जुलै 2016 रोजी नाशिक महापालिकेत आयुक्तपदी बदली झाली होती. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार कुणाल कुमार यांच्याकडेच आहे. ऑगस्ट 2016 मध्ये सरकारने ए. बी. मिसाळ यांची या पदावर नियुक्ती केली होती. परंतु, त्यांनी पदभार स्वीकारलाच नाही. त्यांची धुळे जिल्हाधिकारी म्हणून नंतर नियुक्ती झाली होती.

प्रवासी संख्येत सातत्याने घट
पीएमपीएमएलमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला असून, त्याला अटकाव करण्यासाठी तुकाराम मुंडेे यांच्यासारख्या खमक्या अधिकार्‍याचीच गरज आहे. सध्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात दीड हजार बसेस असून, रोज सरासरी 60 लाख प्रवासी प्रवास करतात. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उपनगरांत ही बससेवा शहरवासीयांना मिळते. दर्जाहिन सेवा, खराब झालेले बीआरटीएस कॉरिडर, प्रवाशांना सुविधांचा अभाव, खराब बसस्थानके यांमुळे गेल्या तीन महिन्यांत या बससेवेची प्रवासी संख्या 40 लाखांहून 32 लाखांवर आल्याचे प्रशासकीय सूत्रांनी ‘जनशक्ति’शी बोलताना सांगितलेे.