पिंपरी चिंचवड : राज्यात 500 मीटरच्या अंतरावर मद्य विक्रीस बंदी घातल्यानंतर दारुची सर्व दुकाने बंद झाली. राज्य सरकारने यासाठीच्या अटी शिथील केल्याने आता पुन्हा ती दुकाने सुरू होणार आहेत. त्यामुळे शुरवीरांचा व संताच्या महाराष्ट्राला भाजप सरकार मद्यराष्ट्र बनवत आहे, असा आरोप माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केला आहे. यासंदर्भात भापकर यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
तीन हजारांहून अधिक बारचा मार्ग मोकळा…
हे देखील वाचा
त्यात म्हटले आहे की, राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावरील 500 मीटरच्या अंतरावर मद्य विकण्यास न्यायालयाने बंदी घातल्यानंतर महामार्गांवरील बार तसेच वाइनशॉपचे शटर डाऊन झाले. ते काहीसे किलकिले करण्याचा प्रयत्न होत असतानाच राज्य सरकारने यासाठीच्या अटी शिथिल केल्या आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रातील पाच हजार लोकसंख्येची अट तीन हजार लोकसंख्या करुन मद्यविक्री परवान्यांच्या नूतनीकरणास परवानगी दिल्याने महामार्गांलगतचा निर्णय झाल्यानंतर ग्रामपंचायत क्षेत्रातील 1500 परमिट रुम, 400 देशी दारुची दुकाने, 700 बीअर शॉपी बंद झाले होते. आता ही सर्व दुकाने पुन्हा सुरु होणार आहेत. त्यामुळे राज्यातील तीन हजारांहून अधिक बार तसेच परमिट रुम पुन्हा उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरकारच्या निर्णयामुळे शुरवीरांचा व संताच्या ‘महाराष्ट्राला’ भाजप सरकार ‘मद्यराष्ट्र’ बनवत आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या समाजजीवनावर विपरीत परिणाम होऊन भारताचे भविष्य असणारी तरुण युवा पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात सापडून उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे आध्यात्मिक, सांस्कृतिक, सुसंस्कृतपणा व नैतिकतेचा टेंभा मिरवणा-या खोटारड्या युती सरकारचा जाहिर निषेध, असे भापकर यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.