नंदुरबार: जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी भाजपकडून कुमुदिनी गावीत यांची निवड करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे पक्षाची गट नोंदणी केली आहे. भाजपाकडे नंदुरबार जिल्हा परिषदेत 23 सदस्यांचे संख्याबळ असून गट नोंदणी वेळी राष्ट्रवादीचे तीन सदस्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता नंदुरबारमध्ये भाजप- राष्ट्रवादीची मैत्री झाली आहे. राष्ट्रवादीच्या पाठींब्याने भाजपची संख्याबळ 26 झाली आहे.
पक्षनोंदणी प्रसंगी खासदार डॉ. हिना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, राष्ट्रवादीचे माजी आमदार शरद गावित यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपाला समान 23 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला सात, राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात रंगलेल्या सत्तासंघर्षाचे नाट्य नंदुरबारातही रंगले आहे. 17 जानेवारीपर्यंत नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड करण्याची मुदत आहे. अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे जाते याकडे लक्ष लागले आहे.