भाजपच्या नगरसेविकेविरोधात गुन्हा

0

टपरीधारकाच्या आत्महत्ये प्रकरणी

पिंपरी : टपरीधारकाला आत्महत्तेस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेविका सुजाता पालांडे यांच्यासह अन्य दोघींविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहरूनगर येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे टपरीधारक सचिन सुरेश ढवळे (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी आज (सोमवारी) गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये भाजप नगरसेविका सुजाता सुनील पालांडे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते.

याबाबत सचिन याचा भाऊ शरद सुरेश ढवळे (वय 38) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पालांडे यांच्यासह शशीकला सचिन ढवळे (वय 40, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुजाता पालांडे या प्रभाग क्रमांक 20 संत तुकारामनरच्या भाजपच्या नगरसेविका आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन याचे संत तुकारामनगर मधील गोल भाजी मंडईजवळ फॅब्रिकेशनचे टपरीवजा दुकान आहे. सोमवारी मध्यरात्री सचिन याने घरच्या छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नगरसेविका सुजाता सुनील पालांडे, शशीकला ढवळे या त्याला त्रास देत असल्याचे त्याने लिहून ठेवले. सचिन याला आत्महत्या करण्यास नगरसेविका पांलाडे यांनी प्रवृत्त केले असल्याचे, फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.