पुणे :- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नसले तरी सुद्धा भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. कॉंग्रेसतर्फे आज लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात तीव्र धरणे आंदोलन करून भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी केल्या.
भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहे
काँग्रेसचे नेते रमेश बागवे म्हणाले की, कर्नाटकात भाजपला बहुमत नसतांनाही भाजपने सरकार स्थापन करुन संविधानाची हत्या करण्याचे काम केले आहे. केंद्राच्या सत्तेचा दुरुपयोग भाजप करत आहे. कर्नाटकामध्ये काँग्रेस-जेडीएसचे बहुमत असतानाही राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापन करण्यास नकार देण्याची घटनाबाह्य कृती केली आहे. त्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे यांनी सांगितले. काँग्रेसने जेडीएसच्या साथीने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर 104 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपनेही सत्ता स्थापनेचा दावा केला.
काँग्रेस – जेडीएसकडे बहुमत असताना देखील अल्पमतात असलेल्या भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापनेला आमंत्रित करुन बीएस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. ही घटनेचा अवमान असून लोकशाही व संविधानाचा खून असल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज एकदिवसीय धरणे आंदोलन केले.
यांची होती उपस्थिती
काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली बेलबाग चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार मोहन जोशो, काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा कमल व्यवहारे, अभय छाजेड, रवींद्र धांगेकर तसेच काँग्रेसचे अनेक नेते कार्यकर्ते सहभागी होते.