मुंबई पालिका देशात श्रीमंत आणि मोठी पालिका म्हणून गणली जात आहे. सोन्याची अंडी देणार्या या पालिकेकडे संपूर्ण जगाचे आणि सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे. आता नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत या पालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने जीवाचे रान केले. गेली 25 वर्षे बस्तान मांडणार्या भाजपने शिवसेनेची युती तोडून स्वतंत्र निवडणुका लढवल्या. आमचाच पक्ष एक नंबरवर येईल आणि सत्ता आम्हीच स्थापन करू, असा गवगवा केला होता. निवडणुकीचा शेवटापर्यंत आमचीच सत्ता येणार अशी ग्वाही देत होते, पण शिवसेनेने भाजपला पाणी पाजत एक नंबरचे स्थान काय राखले आणि भाजपची हवाच काढून टाकली.
निवडणुकीत एकमेकांची उणीदुणी काढणार्या आणि शिवसेनेला पाणी पाजणार्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मवाळ भूमिका घेत पालिकेत आम्ही महापौरासह कोणतेच पद घेणार नाही आणि विरोधी पक्ष नेते पदही घेणार नाही, अशी घोषणा केली. मात्र, ही घोषणा पायधुळी तुडवत आणि मतदारांना मूर्ख बनवत भाजपने शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, शिक्षण, बेस्ट अध्यक्ष आदी पदाच्या निवडणुका लढवणार नाही, अशी भूमिका घेणार्या भाजपने पालिका प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे आपले उमेदवारही जाहीर केले आणि मुंबईकरांना मूर्ख बनवले हे सिद्ध झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे दीड कोटी जनता राहत असून, या जनतेला पालिका सेवा सुविधा पुरवत आहे. या पालिकेमध्ये 5 वेळा शिवसेनेची सत्ता आली आहे. मुंबई महापालिकेत आतापर्यंत बहुमत नसल्याने शिवसेनेला भारतीय जनता पार्टी व इतर पक्ष, अपक्ष यांच्या कुबड्या घेऊन सत्ता मिळवता आली. या वेळी मात्र भाजप आणि शिवसेना या दोन्ही मित्र पक्षात आरोप-प्रत्यारोप होऊन युती तुटली.
आम्ही भ्रष्टाचाराला साथ देत नाही, आम्हाला पारदर्शक कारभार हवा, असे वेळोवेळी वक्तव्य करून भाजपने शिवसेनेवर भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला. निवडणुकीपूर्वी विविध घोटाळे बाहेर काढत शिवसेनेची गोची केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी भाजपची वाढलेली ताकद बघून जागावाटपाची मागणी केली. भाजपच्या मागणीप्रमाणे शिवसेनेला जागा देणे परवडणारे नसल्याने दोन्ही पक्षातील युती तुटली. मुंबई महापालिकेत दोन्ही पक्षांना मिळून मलिदा खाता आला आहे. तरीही भाजपला सत्तेची हाव सुटल्याने शिवसेनेविरोधात निवडणूक लढवत भाजपने शिवसेनेइतकेच उमेदवार निवडूून आणले. शिवसेनेचे 84, तर भाजपचे 82 उमेदवार निवडून आले. दोन्ही पैकी कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने अपक्षांच्या मदतीने आपल्याला पाठिंबा देणार्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7, समाजवादी 6, एमआयएम 2 या पक्षांनी कोणालाही पाठिंबा दिला नाही. कोणीही आपल्या सोबत येणार नसल्याने आणि निवडून आलेल्यांपैकी बहुतेक अपक्षांनी शिवसेनेला साथ दिली.
भाजपला आपली सत्ता काही केल्या येत नाही, याची जाणीव झाल्याने खुद्द मुख्यमंत्र्यांना भाजप महापालिकेतील महापौर, उपमहापौर, समिती अध्यक्ष, बेस्टमधील अध्यक्षपदाची कोणतीही निवडणूक लढवणार नाही, तसेच विरोधी पक्ष नेते पदही भाजप घेणार नाही हे सांगावे लागले. भाजपने आम्ही पारदर्शक कारभाराच्या बाजूने असून पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करू असे जाहीर केले. ज्या भाजपने शिवसेनेवर पारदर्शक नसल्याचा, भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला त्याच शिवसेनेचा महापौर बनावा म्हणून भाजपने पारदर्शकतेचा मुद्दा कचर्याच्या कुंडीत टाकून मतदान केले. अपारदर्शक शिवसेनेच्या हातात महापालिकेची सत्ता देऊन भाजपने राज्यातील शिवसेनेच्या पाठिंब्यावर असलेले आपले सरकार व मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवली आहे. निवडणुकीपूर्वी एकमेकांवर केलेले आरोप यामुळे भाजपा व शिवसेना दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकत नव्हते. दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर ज्या मतदारांनी मतदान केले त्याचा घोर अपमान झाला असता, तरीही मतदारांनी दिलेल्या कौलाचा या दोन्ही पक्षांनी विचार केलेला नाही. वर वर मुंबईकरांना आम्ही विरोधात आहोत हे दाखवत आतून दोघांनी मिळून सत्तेचा उपभोग घेत आहेत. राज्यात आणि आता मुंबई महापालिकेत याचे चित्र दिसत आहे. मुंबई महापालिकेची कोणतीही निवडणूक लढवणार नाही अशी म्हणणारी भाजप आता सेनेबरोबर सेटिंग करून पालिकेतील 17 प्रभाग समित्यांमधील सत्ता वाटून घेणार आहे. महापालिकेच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसता आले नसले, तरी आता प्रभाग समित्यांमधून भाजप आणि शिवसेना मांडीला मांडी लावून बसणार आहे. मतदारांना मूर्ख बनवून आता भाजप सत्तेत सहभागी होत असल्याने भाजपच्या पारदर्शकतेचा बुरखा मात्र फाटलेला आहे हे भाजपनेच सिद्ध करून दाखवले आहे.
– सुनील तर्फे
9869562358