कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये भाजपतर्फे रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. जी व्यक्ती या रथयात्रेला रोखण्याचा प्रयत्न करेल त्याला रथाच्या चाकाखाली चिरडून टाकू असे वादग्रस्त वक्तव्य पश्चिम बंगालच्या भाजप राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्ष लॉकेट चॅटर्जी यांनी केले आहे. ही रथयात्रा राज्यात लोकशाही स्थापन करण्याच्या उद्देशाने आयोजित केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपा अध्यक्ष अमित शाह हे या तीन रथयात्रांची सुरुवात करणार आहेत. राज्यातील सर्व ४२ लोकसभा मतदारसंघात जाणारी ही रथयात्रा ५, ७ आणि ९ डिसेंबरला निघेल. यात्रेच्या समाप्तीनंतर पक्षाची कोलकाता येथे एक सभा होणार असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
चॅटर्जी यांच्या वक्तव्याचा सत्तारुढ तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी निषेध केला आहे. भाजपा नेते प्रक्षोभक वक्तव्ये करत राज्यातील शांतता आणि स्थिरता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बंगालमध्ये आपले धार्मिक धोरण पुढे रेटण्याचा भाजपाचा मुख्य उद्देश आहे. परंतु, बंगालमधील लोक भाजपाचे फुटीरवादी राजकारण यशस्वी होऊ देणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.