भाजपच्या राजवटीतच असहिष्णुता सुरू होते

0

माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा आरोप

पिंपरी-चिंचवड : ‘विविध जातींवर अन्याय होत असतो. त्यावेळी केंद्रातील आणि राज्यातील मायबाप सरकार त्याची दखल घेत नाही, दुर्लक्ष करते. भाजपच्या राजवटीतच असहिष्णुता सुरू होते’, असा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. संत गुरु रविदास विचार समितीतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांना शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्राधिकरणातील संत गुरू रोहीदास मंदिरामध्ये हा सोहळा झाला.

सरकारला धडा शिकवावा लागेल
शिंदे म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना बदलण्याचा डाव पूर्वीच्या भाजप सरकारने केला होता. त्याला त्यावेळी विरोध केला. आत्ता पुन्हा देशात आणि राज्यात तेच सरकार आहे, जे दलित आणि मागासवर्गीयांवर होणार्‍या अन्यायाकडे दुर्लक्ष करीत आहे. एकीकडे सामाजिक समतेच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे दलितांवर अन्याय करायचा, असा खेळ भाजपच्या सरकारने मांडला आहे. सत्तेची मस्ती आलेल्या भाजपची हीच स्थिती राहिली, तर देशात आंदोलनाचा भडका कधी पेटेल सांगता येणार नाही. आम्हालाही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या सरकारला धडा द्यावा लागेल’.

यांची होती उपस्थिती
सोहळ्यास माजी नगरसेवक तानाजी खाडे, शशिकिरण गवळी, सुमन पवळे, जितेंद्र ननावरे, चर्मोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कांबळे, कष्टकरी कामगार पंचायतचे बाबा कांबळे, शिवसेना भोसरी विधानसभा समन्वयक युवराज कोकाटे, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय कांबळे, समितीचे अध्यक्ष संतोष वाघमारे, रमेश साळवे, अरूण लोकरे, विनायक लोकरे आदी उपस्थित होते.