भाजपच्या विकृतीमुळेच धर्म बुडाला:उद्धव ठाकरे

0

मुंबई :’एखादी मुलगी पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा. तिला पळवून आणण्यात मी मदत करेन’, असं वादग्रस्त विधान भाजपचे आमदार राम कदम यांनी केलं होतं. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून कदम यांच्यासह भाजपवर शरसंधान साधलं आहे. ‘कदम यांच्या वक्तव्याविरोधात राज्यातील महिला रस्त्यांवर उतरल्या आहेत. अर्थात त्याचे राजकारण करू नका, तर ही विकृतीच मुळापासून उखडून फेका. लिंगपिसाटांचे राजकारण संपवायला हवे. महिलांनी एकीचा इतिहास घडवावा. त्यांनी एकत्र यावे व सगळ्यात मोठा दणका द्यावा’, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

 ‘श्रीकृष्ण जन्मदिनीच भाजप आमदाराने नवे ‘महाभारत’ लिहिले व त्यावर भाजपचा एकही तोंडाळ पुढारी बोलायला तयार नाही. एरव्ही विरोधकांनी जनतेच्या व देशाच्या प्रश्नांवर आवाज उठवला तरी त्यांना देशद्रोही ठरविण्यासाठी जिभेचे पट्टे चालविणारे स्त्रियांना पळवून नेणाऱ्या आपल्या आमदाराच्या बेताल बडबडीवर तोंड शिवून बसले आहेत’, असा घणाघात करतानाच ‘महाराष्ट्र धर्म बुडाला तो औरंगजेबामुळे नव्हे, तर भाजपच्या विकृतीमुळे’, अशी खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.