पुणे : पुणे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या कामकाजाकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष आहे की नाही? असा प्रश्न राजकीय वर्तुळातील जबाबदार नेते आता विचारू लागले आहेत. महापालिकेत सत्ता येऊन पाच महिने झाले आहेत. या काळात विस्कळीत कारभारच पुणेकरांना पहायला मिळाला आहे. गणेशोत्सवाची माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत महापौर मुक्ता टिळक निरुत्तर झाल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या. हा विस्कळीतपणाचा कळस मानला जात आहे.
वाद आणि तणावाची परंपरा कायम!
गणेशोत्सवाचा विषय सत्ताधार्यांनी गांभीर्याने हाताळला नाही असा आक्षेप उत्सवाच्या आयोजनातील प्रमुख मंडळीसुद्धा घेऊ लागली आहेत. शिवाय, भाजपवर महापालिकेच्या पैशाची उधळपट्टी केल्याचा आरोप वर्तमानपत्रांमधून होऊ लागला आहे. पुण्यात वाद होतातच, त्यामुळे वादाचे टेन्शन घेऊ नका असा दिलासा देण्याचा प्रयत्न पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत बोलताना दिला. पण उत्सवाचा प्रारंभी वादाचे सावट राहिले हे कसे नाकारता येईल? पीएमपीचा कारभार अजून अधांतरीच आहे. प्रशासक म्हणून तुकाराम मुंढे यांना मर्यादा आहेत. त्यांना राजकीय पाठबळ देण्याची गरज आहे आणि तिथे भाजप नेत्यांची कसोटी लागणार आहे. पीएमपीचा पूर्वानुभव लक्षात घेतला तर बसखरेदी हा वादाचा विषय झाला होता. यात अनेक हितसंबंध असतात असेही दिसून आले आहे. येत्या दीड वर्षात 800 बसगाड्या खरेदीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ही खरेदी प्रक्रिया तातडीने आणि पारदर्शी व्हावी अशी अपेक्षा राहील. आजमितीला तरी पीएमपीची सेवा समाधानकारक नाही. बसताफा पुरेसा होईपर्यंत प्रवाशांना सुधारणेची वाटच पहावी लागणार आहे.
भाजपच्या वरिष्ठांनी लक्ष घालावे…
औषध खरेदी, शालेय गणवेश, जलकुंभाच्या निविदा यात भाजपला टीकाच सहन करावी लागली. मेट्रो प्रकल्पात निधी आणि भूसंपादन यात अजून स्पष्टता आलेली नाही. विकास आराखडा अंतिम मंजुरी बाकी आहे, 23 गावातील टेकड्या आणि जमीनमालकांना भरपाई यावरही निर्णय नाही. शहर गतिमान पद्धतीने वाढते आहे त्यादृष्टीने कारभार व्हावा यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्ष घालणे आवश्यक आहे. सर्व पदाधिकारी नवीन असल्याने त्यांना मार्गदर्शनाची गरज तितकीच आहे, असे मत मांडण्यात येते. काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी यांचे नियंत्रण होते. राष्ट्रवादी सत्तेवर असताना अजित पवार धोरणात्मक निर्णयात सहभागी होत होते. भाजप हा सामूहिक नेतृवावर भर देणारा पक्ष आहे, तसे सामूहिक नेतृत्व पालिकासंदर्भात दिसायला हवे.