भारतीय जनता पक्ष देशात साधारणत: तीन वषार्र्ंपूर्वी आणि राज्यात अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आला. लोकसभा निवडणुकीत देशभरातील अनेक पक्षांना मित्र करीत युती-महायुतीद्वारे भाजपचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याची रणनीती यशस्वी ठरली नि सत्तेसाठी आवश्यक असलेले बहुमत मिळाले व भाजपसाठी 273 हा आकडाही पार झाला. ज्या पक्षांनी सहकार्य केले त्यांना सत्तेत घेण्याचे यथातथा कर्तव्य मोदी सरकारने पार पाडले. त्यानंतर महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पक्षांनी लोकसभेत सहकार्य केले त्या प्रमुख पक्षांना निवडणुकीत भाजपने जवळ न करता निवडणुका लढवल्या व त्या त्या राज्यांमध्ये सत्तास्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात अनेक ठिकाणी यश मिळवले, प्रसंगी अन्य पक्षांचे सहकार्यही घेतले. महाराष्ट्र हे त्यातलेच एक उदाहरण. आपल्या उपयोगासाठी मित्रपक्ष म्हणून इतर सर्व पक्षांचे सहकार्य घ्यायचे नि काम झाले की त्या पक्षाला (नि नेत्यांना) दुय्यम स्थान नेणे वा बाजूला सारणे अशी नीती भाजप वापरू लागलीय हा संदेश देशभरात जाऊ लागला आहे. जे वातावरण 2014 सालच्या निवडणुकांमध्ये तसे अनुकूल वातावरण भाजपसाठी आता नाही, ज्या वेगाने ती लाट आली ती त्याचवेगाने ओसरू लागली, हे चित्र पाहावयास मिळत आहे. एकीकडे गरज सरली की मित्रपक्षांना महत्त्व न देण्याचे धोरण अवलंबण्यामुळे त्या पक्षांच्या नेत्यांची नाराजी ओढवून घेण्याबरोबरच काही धोरणात्मक निर्णयांवर जनता नाराज होत असल्याचेही चित्र दिसून आले. त्यामुळे सत्ताधार्यांविरोधात विरोध या मानसिकतेचा फटका भाजपला बसू लागला आहे.
विद्यमान स्थितीत राज्यात वा केंद्रात भाजपविरोधातील वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते. अनेकविध कारणांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते त्यातही शिवसेनेचे नेते भाजपवर सडकून टीका करू लागले आहेत. आताच्या निवडणूक काळातच नव्हे, तर आधीपासूनच सेना भाजपवर टीका करीत आली आहे, निवडणूक काळात या टीका समजण्यासारख्या होत्या. मात्र, आधीच्या काळातील स्थिती अधिक चिघळली असून, व्यक्तिगत टीकाटीप्पणी, आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत, या सार्यांचा निवडणुकांनिमित्ताने सामान्य जनतेशी, त्यांच्या भागातील समस्या-प्रश्नांशी काय संबंध? मात्र यावरच प्रचाराचा वेळ चालला आहे. यातून भाजपविरोधातील वातावरण किती प्रकर्षाने वाढीस लागत आहे, हेही जाणवल्याखेरीज राहत नाही.
केंद्र आणि राज्यातही सत्तेेत भाजपसमवेत शिवसेना आहे, हीच सेना आज भाजपवर कठोर टीका करू लागली आहे. भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या स्वाभिमान शेतकरी संघटनेने भाजपवर नाराजी व्यक्त करीत नाशिक, पुणे भागात आताच्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत जाणार्या शेट्टींना आता भाजप नको असे का वाटले? लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत शिवसेना, आरपीआय, शेतकरी स्वाभिमानी संघटना घटकपक्ष होते. विधानसभा निवडणुकीत सेना बाजूला सरली नि अन्य मित्र पक्ष भाजपसोबत राहिले. मात्र, त्यांच्यातही राजी-नाराजीचे सत्र सुरूच राहिले, आता तर राजू शेट्टी यांनीही भाजपबाबतची नाराजी सेनेला पाठिंबा देत दाखवून दिली आहे.
राज्यात नि देशात अडीच-तीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपविषयी मित्रपक्ष, सहकारी नेते, अगदी जनताही एवढी नाराज का व्हावी? जनमनातही काँग्रेसविरोधी वातावरण निर्माण होण्याकरिता आणि ती मतपेटीतून व्यक्त होण्याकरिता काही दशकांचा कालावधी गेला. अगदी टप्प्याटप्प्याने काँग्रेसवरील नाराजी व्यक्त होत गेली. मात्र, भाजपविषयी लोकांमधील नाराजीही अल्पावधीत व्यक्त होऊ लागली, हे सत्य कोणीही नाकारणार नाही. देशात तत्कालीन काँग्रे्रस सरकारला पर्याय म्हणून लोकांनी भाजपप्रणीत आघाडीला भरभरून मते दिली. मात्र, त्यांनीच दिलेली आश्वासने हवेतच विरून जात असल्याचे चित्र आहे. महागाई कमी झाली नाही, ती कमी होईल याची कोणी शाश्वती देणार नाही. नव्या नोकर्यांची संधी नाही. नोकरकपातीची टांगती तलवार आहे. नोटाबंदीचा निर्णय देशहिताचा असला, तरी लोकांचे पैसे घेऊन त्यांनाच ते परत मिळवण्यासाठी लोकांनाच रांगेत उभे राहावे लागले. यात काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यासह अनेक मुद्दे जनतेला त्रासदायी वाटू लागले आणि विशेष म्हणजे भाजपवाले खोटे बोलतात पण रेटून बोलतात, अशी विचित्र प्रतिमा जनमनातही निर्माण झाली. या सार्याचा फटका या पक्षाला बसू लागला आहे. आधीच्या निवडणुकांमध्ये सोशल मीडियाने भाजपला मोठी साथ दिली. मात्र, आताचे चित्र पाहता हेच माध्यम बूमरँगप्रमाणे भाजपवरच उलटल्याचे दिसून येते. भरती-ओहोटी निसर्ग नियमाने होत असते, त्सुनामीची लाट कधी तरी येते, भाजपची स्थिती त्सुनामीसारखी तर झाली नाही ना? चेंडू ज्या वेगाने भिंतीवर फेकावा त्याच वेगाने तो परत येतो, हा निसर्ग नियम आहे. भाजपवर कडवट टीका का होतेय? या प्रश्नाचे उत्तर शोधताना भाजपची ध्येयधोरणे खरेच जनहिताची आहेत का?, असतील तर लोकांमध्ये नाराजी का व्हावी? ज्या घटकपक्षांना जवळ करायचे त्यांना दुय्यम स्थान देत त्यांची नाराजी ओढवून घेणे राजकीय हिताची ठरू शकते? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे महत्त्वपूर्ण ठरावीत.
– रामनाथ चौलकर