मुंबई/पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांचीच पुनर्रावृत्ती मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झाली. सत्ताधारी भारतीय जनता पक्षच सर्वात मोठा पक्ष ठरला असून, 25 पैकी 10 जिल्हा परिषदांत भाजपचे अध्यक्ष निवडून आले आहेत. शिवसेना-काँग्रेसची झालेली अभद्र युती, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनेही या युतीला दिलेला पाठिंबा आणि भाजपला एकटे पाडण्याचे कारस्थान, असे राजकारण रंगूनही भाजपने राजकीय करिष्मा दाखविला. सर्वाधिक दहा अध्यक्षांसह भाजप पहिल्या स्थानावर तर राष्ट्रवादी काँग्रेस सहा, काँग्रेस 5 आणि चार जिल्हा परिषदांवर शिवसेनेचे अध्यक्ष विराजमान झाले आहेत.
बीडमध्ये धनंजय मुंडेंना पंकजांचा धक्का
नगरपालिका, महापालिका आणि आता जिल्हा परिषदांमध्येही भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राज्यात समोर आला. अनेक ठिकाणी काँग्रेसने शिवसेनेशी हातमिळवणी केली तर भाजपनेही मुख्य विरोधक असलेल्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन काही ठिकाणी सत्ता हस्तगत केली. मुंडे भावाबहिणींच्या वादामुळे प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्हा परिषदेत पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांना जाळ्यात ओढून धनंजय मुंडेंना धक्का दिला. त्यामुळे राष्ट्रवादीचे जास्त सदस्य असूनही भाजपचा अध्यक्ष विराजमान झाला. नाशिकमध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी चक्क शिवसेना-काँग्रेस आणि माकप अशी आघाडी बघायला मिळाली. तर सोलापुरात भाजपने काँग्रेससोबत महाआघाडी करुन राष्ट्रवादीचा दणदणीत पराभव केला.
उत्तर महाराष्ट्रात सेना-भाजप समसमान
पश्चिम महाराष्ट्रातील सहापैकी तीन जिल्हा परिषदांत भाजपची सत्ता तर नगरमध्ये काँग्रेस, पुणे व सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष निवडून आला असून, उत्तर महाराष्ट्रात शिवसेना-भाजपला समसमान अध्यक्षपद मिळाले आहे. जळगावात भाजपचा अध्यक्ष झाला असून, नाशिकमध्ये काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे. कोकणातील जिल्हा परिषदांत मात्र काँग्रेस, शिवसेना अन् काँग्रेसलाच अध्यक्षपद मिळवता आले असून, तेथे भाजपची जादू चालली नाही. मराठवाड्यात आठपैकी फक्त बीड आणि लातुरात भाजपचा अध्यक्ष होऊ शकला असून, औरंगाबाद, जालना, हिंगोलीत शिवसेना तर परभणी, उस्मानाबादेत राष्ट्रवादी अन् नांदेडात काँग्रेसचा अध्यक्ष झाला आहे.