राणेंमुळे रिक्त झालेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी धुमशान; राणेंच्या मुद्द्यावरून भाजपकडून शिवसेनेची मनधरणी
मुंबई : विधानपरिषदेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीचे वातावरण सध्या जोरदार तापले आहे. आगामी विधानसभा हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य सरकारच्या विरोधात वातावरण तापले असतानाच सर्वपक्षीय नेत्यांच्या गुप्तगू आणि बंद दाराआडच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गुरुवारी महसूल मंत्री आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय समजले जाणारे चंद्रकांतदादा पाटील यांनी मातोश्री निवास स्थानी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेवून सुमारे दीड तास चर्चा आणि सहभोजन केले. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भेट घेवून चर्चा केली. स्वाभिमानी पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेवर येत्या सात तारखेला मतदान होत असून, या जागेवर शिवसेना आणि भाजप यांचा समान उमेदवार असावा आणि दोन्ही पक्षानी सहमतीने उमेदवार द्यावा, अशी चर्चा मातोश्रीवर आजच्या बैठकीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत चर्चा करण्याइतपत मी मोठा नेता नाही, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
चंद्रकांतदादा म्हणतात राजकीय चर्चा नाही!
उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांच्यात मातोश्रीवर बैठक झाली. मात्र ही बैठक पोटनिवडणुकीसंदर्भात नसल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आपली बराच वेळ चर्चा झाली, मात्र ही राजकीय चर्चा नाही. महाराष्ट्रातील खड्ड्यांबाबत आढावा दौर्याबाबत उद्धव ठाकरेंनी माहिती दिली. मी फक्त मला दिलेले काम पार पाडतो, इतर कामात ढवळाढवळ करत नाही. उद्या, शुक्रवारी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री दोघेही पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्यावर असल्याने एकाच विमानात जाऊ अशी त्यांना विनंती केली, मात्र वेळ वेगळी असल्याने ते शक्य नव्हते, असे पाटील यांनी सांगितले. नारायण राणेंच्या उमेदवारीवरून संभ्रमाचे वातावरण तयार होवून त्यातून शिवसेनेने आपला वेगळा उमेदवार देण्याची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळाल्यानेच भाजपच्या संकटमोचन नेत्यांनी धाव घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
फडणवीस-ठाकरे यांच्यात गुप्तगू
शिवसेनेच्या सहमतीने संयुक्तपणे उमेदवार देतील अशी हमी या नेत्यांनी दिल्याचे सूत्रानी संगितले. त्यामुळे नारायण राणे यांची उमेदवारी सध्या नसल्याचे स्पष्ट झाल्याचेदेखील या सूत्रांनी स्पष्ट केले. भेटीत पोटनिवडणुकीसाठी नारायण राणे यांच्याऐवजी भाजपचा उमेदवार दिल्यास शिवसेनेची भूमिका काय राहील, हेदेखील जाणून घेण्यात आले. सेनेचा केवळ राणेंना विरोध आहे, भाजपने अन्य उमेदवार दिल्यास शिवसेनेच्या पाठिंब्याने सहज विजय मिळू शकतो, याबाबत फडणवीस आणि ठाकरे यांच्यात फोनवरून गुफ्तगू झाली असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यानंतर गुरुवारी चंद्रकांत पाटील आणि तावडे यांनी मातोश्रीवर हजेरी लावली. राणे यांच्या नावाची चर्चा मावळल्याने भाजपचे प्रवक्ते प्रसाद लाड, माधव भंडारी, शायना एन.सी, बाळ माने काही उद्योग क्षेत्रातील अन्य व्यक्तींच्या पर्यायाचीही चर्चा या बैठकीत करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.