भाजपने केलेले आरोप केवळ प्रसिद्धीसाठी; आमदार रघुवंशी यांचा पलटवार

0

नंदुरबार- छत्रपती शिवाजी नाट्यमंदिरातील खुर्च्या बदलण्याचे दीड कोटी रुपयांचे काय पण एक रुपयाचे बिल देखील निघालेले नाही त्यामुळे भाजपाच्या चमूने जो आरोप केला आहे तो केवळ फुकटात प्रसिद्धी मिळवण्यासाठी केला आहे असा पलटवार काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला. व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार चंद्रकांत रघुवंशी हे चेन्नई येथे उपचारासाठी गेलेले आहेत. त्यातच भाजपाचे डॉ.रविंद्र चौधरी व पालिकेतील गटनेते चारुदत्त दर यांच्याकडून पत्रकार परिषद घेऊन नगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेस गटावर नाट्यमंदिरातील खुर्च्या बदलण्याचे दोन वेळा काढल्याचा आरोप करण्यात आला होता. आमच्याकडे पुरावे असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी डॉ.रविंद्र चौधरी यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी थेट चेन्नईहून व्हिडिओ कॉन्फरन्स नंदुबार येथे पत्रकारांशी संवाद साधला. माझ्या आजारपणाचा मला दुःख नाही पण विरोधकांनी केलेल्या खोट्या आरोपांनी व्यथित होतोय अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातमी-दोन वेळा बिले काढल्याचे पुरावे; नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा-डॉ.रविंद्र चौधरी

होय मी नगरपालिका चालवतो, कोणत्याही प्रकरणाची शहानिशा केल्याशिवाय प्रकरण पुढे जाऊ देत नाही. काम पारदर्शक असावे हे माझे उद्देश आहे. माझ्या पत्नी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या सहीनेच कामे होतात. बनावट सही कोठेही नसते असा खुलासा देखील आमदार रघुवंशी यांनी केला आहे.

डॉ.रविंद्र चौधरी यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत आमदार रघुवंशी म्हणाले की नगरपालिका बरखास्तीची वाट पाहण्यापेक्षा पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तयारीला आतापासून लागा असा सल्ला दिला. नगरपालिका निवडणुकीत लोकांनी तुम्हाला का नाकारले, का नाकारले याचे आत्मचिंतन करा असा सल्लाही त्यांनी दिला.