जयपूर : पाकिस्तान दौऱ्यामुळे वादात सापडलेले काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. राजस्थान निवडणुकीच्या प्रचारावेळी नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारतीय बँकांना कोट्यावधीचा चुना लावून परदेशात पळ काढणारे कर्जबुडवे उद्योगपती नीरव मोदी आणि ललित मोदीवरुन भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. काँग्रेसने आपल्याला चार गांधी दिले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने तीन मोदी दिले आहेत, नीरव मोदी, ललित मोदी आणि अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी, अशी टीका नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली आहे. करतारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभाला हजेरी लावण्यासाठी सिद्धू पाकिस्तानला गेल्याने निर्माण झालेला वाद ताजा असतानाच त्यांनी हे विधान केले आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठीच्या २०० जागांसाठी ७ डिसेंबरला मतदान होणार आहे. सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करण्याचे एकही संधी सोडत नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला पाकिस्तानला पाठविलेले नव्हते, असे नवे स्पष्टीकरण नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी दिले आणि आधीच्या आपल्या वक्तव्यावरून त्यांनी घूमजाव केले. करतारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभाला हजेरी लावण्यासाठी सिद्धू पाकिस्तानला गेल्याने वाद निर्माण झाला आहे. पण ‘राहुल गांधी यांनीच आपल्याला पाकिस्तानला जायला सांगितले होते, असा दावा सिद्धू यांनी केला होता. त्यावरून नवा वाद निर्माण होताच, सिद्धू यांनी घूमजाव केले.
शिवाय, अमरिंदर सिंग हे माजी लष्कर कॅप्टन आहेत. याचा संदर्भ घेऊन सिद्धू यांनी म्हटले होते की, राहुल गांधी हेच माझे कॅप्टन आहेत. यावरुन तृप्त राजेंद्र सिंग बजवा यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी करत म्हटले की, सिद्धू हे अमरिंदर यांना कॅप्टन समजत नसतील, तर त्यांनी नैतिक जबाबदारीनुसार मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा.