भाजपने देशावर सामाजिक गुलामगिरी लादली – विरोधी पक्षनेते खा.मल्लिकार्जुन खर्गे

0

खोटा जीआर काढून भाजपने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची थट्टा केलीय – खा.अशोकराव चव्हाण

जनसंघर्ष यात्रा व जाहीर सभेस लोटला जनसागर

अंबाजोगाई : भाजपने सत्ता आल्यानंतर देशाच्या तिजोरीची प्रचंड लुट केली, अन्यायकारक कायदे काढले, डिझेल, पेट्रोलची दरवाढ केली, राफेल विमान खरेदीत घोटाळा केला. बँका लुटणार्‍या निरव मोदी, विजय मल्या,मेहता, चोकसी यांना देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली. रातोरात सीबीआयचे संचालक बदलले,प्रसार माध्यमांवर बंधने आणली. देशावर सामाजिक गुलामगिरी लादली. अशा भ्रष्ट चौकीदारापासून देशास धोका निर्माण झाला आहे. कारण,भाजपचा चौकीदारच आज चोर निघाला आहे अशी जोरदार टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते व महाराष्ट्राचे प्रभारी खा.मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. देशाच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी, भारतात धर्मनिरपेक्षता, सौहार्द टिकवण्यासाठी 2019 ला काँग्रेसला मत देवून भाजपला नेस्तानाबूत करा असे आवाहनही खा.मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज गुरूवार,दि.1 नोव्हेंबर रोजी अंबाजोगाईत आली. या यात्रेचे जाहीर सभेत रुपांतर झाले. सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी खा.मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री प्रा.सुरेशराव नवले, प्रा.सत्संग मुंडे, प्रा.टि.पी.मुंडे, माजी आ.सिराज देशमुख, माजी आ.नारायणराव मुंडे,बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, मिनाक्षीताई पांडुळे, दादासाहेब मुंडे, नगराध्यक्षा सौ.रचना सुरेश मोदी,नगराध्यक्ष आदित्य पाटील, प्रा.सर्जेराव काळे, डॉ.अंजलीताई घाडगे, राजेसाहेब देशमुख, बाबुराव मुंडे,संजय दौंड,यांच्यासह पक्षाचे राज्य व जिल्हा पातळीवरील नेते यांची प्रमुख उपस्थित होती.

यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, शासनाच्या विरोधात महाराष्ट्राच्या हितासाठी आणि जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. या यात्रेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळत आहे.ऐन दुष्काळात सरकार खोटे जीआर काढून व आश्‍वासने देवून जनतेची दिशाभूल करीत आहे. मोबाईलच्या लाईटखाली मंत्री दुष्काळाची पाहणी करीत आहेत.कारण, महाराष्ट्रच अंधकारात बुडाला आहे.त्यामुळे असे भ्रष्ट नाकरते सरकार सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी काँग्रेसला ताकद द्या असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोकरावजी चव्हाण यांनी केले.

प्रास्ताविक करतानां बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस हा राज्यात सक्षम विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे काम करीत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जनतेच्या विविध प्रश्‍नांसाठी रस्त्यावर येवून आंदोलने,मोर्चे काढले आहेत. हा संघर्ष म्हणजे केवळ विरोधासाठी विरोध नाही तर सकारात्मक दृष्टिकोनातून काँग्रेस पक्ष काम करीत आहे. राज्यातील शेतकरी,कष्टकरी, विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्‍नांसाठी जनसंघर्ष यात्रा काढली आहे.आज अंबाजोगाई सभा होत असुन काँग्रेसचा जनाधार वाढत आहे. बीड जिल्ह्यात केज व बीड विधानसभा मतदार संघ काँग्रेसला मिळावेत अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी खासदार रजनीताई पाटील,माजी मंत्री प्रा.सुरेशराव नवले, प्रदेश सरचिटणीस प्रा.टि.पी.मुंडे. डॉ.अंजलीताई घाडगे यांची समायोचित भाषणे झाली.सभेचे सुत्रसंचालन बीड जिल्हा प्रभारी प्रा.सत्संग मुंडे व प्रा.अनंत कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बीड जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके यांनी मानले. सभेच्या यशस्वितेसाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. या सभेसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.