भाजपने भ्रमात राहू नये – माजी मंत्री सुरेशदादा जैन

0

7 शिवाजी नगर येथील निवासस्थानी शिवसेनेची बैठक
महानगर पालिका निवडणूकी संदर्भात चर्चा

जळगाव । जामनेर नगरपालिका निवडणूकीत भाजपने शंभर टक्के यश मिळविल्यानंतर आगामी काळात होत असलेल्या जळगाव महानगर पालिका निवडणूकीबाबत भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यामधून ‘जामनेर तो झाकी है, जळगाव अभी बाकी है’ अशी वल्गना केली जात आहे. मात्र जामनेरमधील यश हे मंत्री गिरीश महाजन यांच्या कामांमुळे मिळालेला असून जळगावमध्ये महाजन यांच्या करिष्मा चालेल असे नाही, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी 75 जागेच्या भ्रमात राहू नये असा टोला माजीमंत्री सुरेशदादा जैन यांनी लगावला आहे. त्यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी शिवसेनेची मनपा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांच्याशी संवाद साधला असतांना ते बोलत होते.

याचना समजू नये
महानगर पालिका निवडणूकीबाबत आम्ही सन्मानपूर्वक भाजपला युतीबाबत प्रस्ताव दिलेला आहे. आम्ही स्वतःहून युतीसाठी प्रस्ताव दिला याचा अर्थ याचना करीत आहोत असं नाही तर सन्मानाची वागणुक म्हणून युतीचा प्रस्ताव दिलेला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे युतीचा संदेश पाठविला आहे. आठवडाभर वाट बघू त्यानंतर आघाडी, सेना किंवा महाआघाडी अशा तीनही पर्यायामधून एका पर्यायाची घोषणा करु असे सुरेशदादा यांनी सांगितले. आमच्याकडून निवडणूकीचे पूर्ण नियोजन झाले असून एप्रिल अखेर याबाबत खुलासा केला जाईल असेही त्यांनी सांगितले.

विकासाबाबत सकारात्मक
जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे जामनेर नगरपालिकेच्या निवडणूकीत व्यस्त होते. त्यामुळे त्यांनी अद्याप युतीबाबत पाठविलेल्या प्रस्तावावर अभिप्राय कळविलेले नाही. दरम्यान आता निवडणूक संपली असून त्यांनी लवकरात लवकर आपले अभिप्राय कळवावे असे आवाहन माजीमंत्री सुरेशदादा जैन यांनी केले आहे. शहराच्या विकासासाठी एकत्र येऊन निवडणूक लढण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत असे सुरेशदादा जैन यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
बैठकीत माजीमंत्री सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, आर.ओ.पाटील, महापौर ललित कोल्हे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी उपमहापौर सुनील महाजन आदींसह निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांची उपस्थिती होती. याबैठकीत मनपा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.

उमेदवाराची चिंता नाही
शिवसेनेची बैठकीत युतीसंदर्भात काहीही निर्णय होवो परंतू कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. सद्यस्थिती मनपावर खान्देश विकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे खाविआ हा पर्याय तर आहेच शिवाय इतर पर्याय आमच्यासाठी खुले असल्याचे सुरेशदादा यांनी सांगितले. तसेच आमच्याडे उमेदवारीसाठी चांगले चेहरे असून उमेदवाराची चिंता आम्हाला नाही असेही त्यांनी सांगितले.