भाजपने महाराष्ट्र सरकार पडण्याचे स्वप्न सोडून द्यावे: गुलाबराव पाटील

0

जळगाव: मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये भाजपकडून कॉंग्रेस सरकार पडण्याच्या हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे. राजस्थाननंतर महाराष्ट्रात देखील हा प्रयोग भाजपकडून होईल अशी चर्चा आहे. दरम्यान याबाबत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आले असता, त्यांनी मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसची संख्याबळ कमी असल्याने भाजप सरकार पाडण्यात यशस्वी ठरले, मात्र राजस्थानमध्ये त्यांना जोरदार धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील सरकार पडण्याचे स्वप्न तर भाजपने सोडूनच द्यावे असा टोला लगावला आहे. जळगावात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडे १७० आमदारांचा पाठींबा आहे. आमदार काय बैल जोडी आहे का कोणीही पळवून नेईल? असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला.

माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे ‘मला कोरोना झाल्यास शासकीय रुग्णालयातच दाखल करा’ असे सांगितल्याचे वृत्त माध्यमातून आले. यावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय रुग्णालयातील उपचार पद्धतीवर विश्वास आहे. शासकीय रुग्णालयात सध्या चांगले उपचार दिले जात असल्याने त्यांनी ती इच्छा व्यक्त केली असेल असा चिमटा गुलाबराव पाटील यांनी काढला.