मुंबई: ‘भाजपने सत्ता, पद आणि पैशांचा गैरवापर केला. राजभवनालाही सोडलं नाही. हेच भाजपवाले अजित पवार यांची जागा ऑर्थर रोडमध्ये आहे, असं विधानसभेत सांगायचे. याच धमक्या देऊन अजित पवार आणि इतर आमदारांना फोडलं का, याचा शोध घ्यावा लागेल. कदाचित मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठका अजित पवारांसोबत ऑर्थर रोडमध्ये घेण्याचं ठरलं असेल,’ असा टोला राऊत यांनी भाजपला हाणला. ‘भाजपच्या या राजकारणाला राज्याची जनता योग्य ते उत्तर देईल,’ असं राऊत म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना फोडून शिवसेनेच्या सत्तासमीकरणांना धक्का देणाऱ्या व राज्यात पुन्हा सरकार स्थापन करणाऱ्या भाजपवर शिवसेनेनं जोरदार तोफ डागली आहे. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ जाहीरपणे लोकांसमोर का घेतली गेली नाही? याचाच अर्थ हे पाप आहे. भाजपनं रात्रीच्या अंधारात दरोडा घातला आहे,’ अशी तोफ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डागली आहे.
राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळवून आणण्यात संजय राऊत यांचा महत्त्वाचा वाटा होता. कोणत्याही क्षणी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचं सरकार स्थापन होईल असं वाटत होतं. मात्र, अचानक चक्रे फिरली आणि देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी आठ वाजता राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापाठोपाठ अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी फूट पाडून अजित पवार भाजपला मिळाल्याचं यातून स्पष्ट झालं. या सगळ्या घडामोडीमुळं शिवसेना संतापली आहे.