भाजपमधील राजीनामानाट्य संपले; महापौर कामाला लागले!

0

पुढे आमदार महेशदादा जो निर्णय घेतील तो मान्य : महापौर काळजे
‘जनशक्ति’चे वृत्त खरे ठरले, पक्षांतर्गत वादळ अखेर थंडावले

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी राहुल जाधव यांची वर्णी न लागल्याने नाराज झालेले महापौर नितीन काळजे यांच्यासह आ. महेशदादा समर्थकांनी आपल्या तलवारी अखेर म्यान केल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी आ. लांडगे यांच्याशी चर्चा केल्याचे खात्रीशीर वृत्त असून, त्यानंतर राजीनामानाट्य संपुष्टात आल्याचे पक्षाच्या वरिष्ठस्तरीय नेतृत्वाकडून सांगण्यात आले. विशेष बाब म्हणजे, पक्षांतर्गत वादळ थंडावणार असल्याचे वृत्त दैनिक जनशक्तिने सोमवारच्या अंकात प्रकाशित केले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे. पक्षाच्या शहराध्यक्षांकडे राजीनामा दिलेल्या महापौरांनी पुन्हा कामकाजाला सुरुवात केली असून, या राजीनाम्याबाबत आ. महेश लांडगे जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, असे महापौरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, स्थायी समितीचा सभापती हा भाजपचाच होणार असून, त्यांना आमचे सहकार्य राहील, असेही ते म्हणाले. त्यामुळे भाजपातील फुटीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांना मोठा धक्का बसला आहे. दिलेले राजीनामे फेटाळून लावण्याच्या सूचना प्रदेश पातळीवरील नेत्यांनी शहराध्यक्षांना दिल्या असल्याचेही विश्वासनीय सूत्राने सांगितले आहे.

वरिष्ठांची दोन्ही गटांशी चर्चा
स्थायी समितीचे सभापतिपद ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार आमदार महेश लांडगे यांच्या गटाला देण्यात येणार होते. त्यामुळे आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक राहुल जाधव यांच्याकडे हे पद येईल अशी अपेक्षा आमदार गटाला होती. परंतु, या पदासाठी जुन्या गटाने शीतल शिंदे आणि विलास मडिगेरी यांच्या नावाचा आग्रह धरला. याच्या वादाचा फायदा घेत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या समर्थकांचे स्थायीच्या सभापतिपदासाठी नाव निश्चित करुन घेतल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होत आहे. भाजपतर्फे ममता गायकवाड यांचा एकमेव अर्ज भरण्यात आला. त्यामुळे आमदार महेश लांडगे गटाने आक्रमक रुप धारण केले. महापौर नितीन काळजे यांनी तडकाफडकी महापौरपदाचा राजीनामा भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे दिला. महापौरांनी राजीनामा दिल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. तसेच नाराज स्थायी समिती सदस्य राहुल जाधव, शीतल शिंदे यांनीदेखील राजीनामे दिले. त्यामुळे भाजपमध्ये बंडाळी माजल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, पालकमंत्री गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी या बंडाळीची तातडीने दखल घेऊन दोन्ही गटांशी चर्चा केली. त्यानंतर दिलेले राजीनामे फेटाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा नंतर केली जाणार आहे.

सभापती शेवटी भाजपचाच होईल : महापौर
आमदार महेश लांडगे समर्थकांनी बंडाची भूमिका घेत राजीनामे देऊ केले होते. परंतु, दोन दिवसाच्या आतच बंडोबा थंड झाले आहेत. महापौर नितीन काळजे यांनी पुन्हा कामकाजाला सुरुवात केली असून, महापौरांनी सोमवारी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबत विविध उद्घाटनाच्या कार्यक्रमांना हजेरीदेखील लावली होती. याबाबत बोलताना महापौर नितीन काळजे म्हणाले, मी भाजपच्या शहराध्यक्षांकडे महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट निर्णय घेतील. आमचे नेते आमदार महेश लांडगे जो निर्णय घेतील, तो मला मान्य असणार आहे. स्थायी समिती सभापती हा शेवटी भाजपचा होणार आहे. आमचे त्यांना सहकार्य असेल, असेही महापौर काळजे यांनी स्पष्ट केले.