मुंबई:माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीदर्शनाच्या निमित्तानं सध्या देशभर भाजपकडून सुरू असलेल्या जाहीर कार्यक्रमांवर शिवसेनेनं जोरदार टीका केली आहे. ‘भाजपमध्ये बुजुर्ग नेत्यांना महत्त्व राहिलेले नाही. पण त्यांच्या अस्थींना महत्त्व मिळत आहे,’ असा खोचक टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला हाणला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय. वाजपेयींच्या अस्थींचं दर्शन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना करता यावं म्हणून भाजपकडून त्यांचा अस्थीकलश देशभरात फिरवला जात आहे. मात्र, कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळं त्यातील गांभीर्य हरवून गेलं आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्ते अस्थींकलशासोबत फोटो काढत असल्याचं प्रसारमाध्यमातून समोर आलंय. हाच धागा पकडून उद्धव यांनी भाजपवर तोफ डागली आहे. ‘वाजपेयींच्या अस्थींचं हास्यास्पद राजकारण सुरू आहे. महान अटलजींना मृत्यूनंतर लहान करण्याचे प्रयोग सुरू आहेत,’ असा आरोप उद्धव यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखातून माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांचीही प्रशंसा केली आहे.