भाजपमध्ये वेगवान घडामोडी

0

सुप्तसंघर्ष, वर्चस्ववादाची लढाई आणि उद्विग्न होऊन विधाने

राजेंद्र पंढरपुरे – पुणे । गेल्या दोन-तीन दिवसांत पुण्यातील भारतीय जनता पक्षात वेगवान घडामोडी घडल्या. पक्षातील राजकारणावर दूरगामी परिणाम करण्यार्‍या असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे यांच्यातील सुप्तसंघर्ष डोके वर काढू लागला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी उद्विग्न होऊन विधाने केल्याची चर्चा आहे. पुण्यातील दोन आमदार ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे सूचित करून काकडे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

काकडेंना राज्याच्या राजकारणात रस
भाजपने २०१९ची लोकसभेची लढाई जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये घडतंय ते पहाणे राजकीय निरीक्षकांना महत्त्वाचे वाटते. काकडे-बापट हा संघर्ष पुण्यातील वर्चस्ववादाचा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री या नात्याने राजकीय आणि प्रशासकीय सूत्रे बापट यांच्याकडे आहेत. पक्षांतर करून भाजपमध्ये आणलेले नगरसेवक आणि मुख्यमंत्र्यांशी जवळीक हे काकडे यांचे राजकीय भांडवल आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ४० मतदारसंघांची जबाबदारी काकडे यांच्याकडे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे काकडे यांना राज्याच्या राजकारणात रस असल्याचे दिसू लागलेय.

खासदारावर गुन्हा; गंभीर घटना
एकीकडे शहर पातळीवर या घडामोडी घडत असतानाच दरम्यान माजी खासदार प्रदीप रावत यांच्यावर केंद्र सरकारने भारतीय शिपिंग कोर्पोरेशनचे अध्यक्षपद देऊन नवी जबाबदारी दिली आहे. या राजकीय हालचाली चालू असताना काकडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सत्ताधारी पक्षाच्या खासदारावर गुन्हा दाखल होणे ही राजकारणात गंभीर घटना मानली जाते.

जुन्या नेत्यांचाही सन्मान
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी शिपिंग कार्पोरेशनचे अध्यक्षपद देऊन रावत यांनाही मोदी सरकारच्या मोठ्या जबाबदारीत सामावून घेतले. नवीन लोकांचे पक्षात स्वागत करताना जुन्या नेत्यांचाही सन्मान ठेवला जाईल असा संदेश रावत यांच्या नेमणुकीने मोदी आणि शहा यांनी दिला आहे.रावत यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत, त्यांच्यात आता उत्साहाचे वातावरण असून पक्षाचे बळ वाढेल.

पालिका पदाधिकार्‍यांची पांगापांग
पुण्यातील खासदार अनिल शिरोळे यांनी काकडे यांच्याशी संबंध सौहार्दाचे ठेवले आहेत. भाजपमध्ये मुंडे आणि गडकरी अशी विभागणी असायची, आता गडकरी, फुंडकर, दानवे, तावडे अशा नेत्यांमध्ये आमदार आणि पालिका पदाधिकार्‍यांची पांगापांग झाली आहे. पुण्यात गटबाजी थोपविण्यासाठी शिरोळे,रावत आणि बापट यांना विभाग नेमून दिले होते.यापैकी रावत यांना सत्तेत वाटा मिळाला नव्हता आणि अशा वाट्यासाठी रावत इच्छुक नव्हते.

ही ‘त्याची’ सुरुवात…
मोदी आणि फडणवीस यांना येत्या दीड वर्षांत रिझल्ट द्यावयाचा आहे, त्यामुळे ते कोणालाही जुमानणार नाहीत,भरीव काम करणार्यालाच पक्षात महत्त्व राहील, असे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने जनशक्तिला सांगितले. रावत यांची नेमणूक ही सुरुवात आहे, असेही मानले जाते.