भाजपमध्ये हे घडणारच होते

0

भाजपच्या पस्तीस नगरसेवकांनी अपक्ष खासदार संजय काकडे यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन शहरातील विकास कामांची चर्चा केली. काकडे यांचे हे शक्तिप्रदर्शन मानले जाते. आणि असे घडणारच होते. कदाचित पस्तीस ही संख्यासुध्दा वाढेल. पुणे महापालिकेत भाजपचे 98 नगरसेवक आहेत. त्यातील 40 नगरसेवक असे आहेत की ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वा त्या परिवाराशी संबंधित नाहीत. भाजपच्या लाटेचा फायदा घेण्यासाठी ते 40 जणं काकडे यांच्यामार्फत भाजपमध्ये आलेले आहेत. त्यांची पहिली निष्ठा काकडे यांच्याशी आहे आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादीतून आलेल्यांच्या मनात आजही शरद पवारांविषयी आदर आहे आणि काँग्रेस जनांचा ओढा मूळ पक्षाकडेच अजुनही टिकून आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पाठिंबा वाढू लागल्याने भाजपमध्ये आलेल्या काँग्रेस जनांमध्ये चलबिचल आहे. महापालिका निवडणुकीनंतर सर्व नगरसेवकांची संघाचे कार्यालय असलेल्या मोती बाग येथे भेठ घडवून आणण्यात आली. संघाशी जवळीक निर्माण व्हावी असा या भेटीमागचा उद्देश होता. नव्याची नवलाई असल्याने या भेटीचे कौतुक झाले. पुढे दैनंदिन कारभार सुरु झाल्यावर काँग्रेसमधून भाजपत आलेल्या नगरसेवकाला विचारले की नवीन पक्षात तुम्ही सामावून गेलात का? त्यावर त्यांनी व्यावहारिक उत्तर दिले ते असे की, एक वर्षभर इम्ही या लोकांचे ऐकणार आहोत, आमची काही कामे करुन घेणार आहोत. त्यानंतर आम्ही आमच्या शैलीत वागू. भाजपसाठी हा एकप्रकारे इशाराच होता. काकडे यांच्या घरी यापैकी काही जणं जमले. आपल्या शैलीत वागण्यासाठी त्यांनी वर्षभराचीही वाट पाहिली नाही. भाजपमध्ये हे घडणारच होते.

महापालिकानिवडणुकीची रणधुमाळी चालू होती तेव्हा काकडे यांनी आयाराम गयाराम पद्धतीने अन्य पक्षांतील नगरसेवक भाजपमध्ये आणायला सुरुवात केली तेव्हा भाजपतील आठही आमदार अस्वस्थ झाले, त्यांनी एकत्र बैठका घेतल्या, काकडे यांच्या कार्यपद्धतीबद्दल वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. तरिही काकडे यांनी आपली मोहीम चालूच ठेवली. पुढेपढे तर काही आमदारांनीच काकडे यांच्याशी जमवून घेतले. पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनार्थ काकडे यांनी मिरवणूक काढली होती. त्या मिरवणुकीत काही आमदार सहभागी झाले. ही तडजोड अनाकलनीय होती. काकडे यांचा वाढता प्रभावच त्यातून मान्य केला गेला. पालिका निवडणूक निकालानंतर काही काळ शांत राहिलेल्या ककडे यांनी आता परत उसळी घेतली आहे. पालिकेतील भाजपच्या कामगिरीबाबत ते समाधानी नव्हते त्यांनी शेरेबाजी केली. त्याला एका गटाकडून उत्तरेही देण्यात आली होती.

अशा प्रकारे भाजपमध्ये गटबाजी आकार घेत आहे. अलीकडेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा प्रदर्शीत केली आहे त्याबरोबरच अन्य इच्छुकांनीही डोके वर काढले असून दावे प्रतिदावे चालू केले आहेत. त्यामुळे आगामी काळात लोकसभेच्या तिकीटासाठी वेगवेगळ्या प्रकारे शक्ती प्रदर्शन केले जाईल. त्याला केंद्र आणि राज्यातील काही नेते फूस देतील. काँग्रेस स्टाईलच
सर्व होईल.

मेट्रो, उड्डाणपूल, पंतप्रधान आवास योजना, झोपडपट्टीवासियांसाठी पक्की घरे, मुठा नदी सुधार योजना, समान पाणी पुरवठा, पालिकेची हद्दवाढ, 23 गावांतील टेकड्यांचे आरक्षण, पालिकेतील शाळांचा दर्जा सुधारणे, पीएमपीत सुधारणा करणे, पुणे कँशलेस करणे आश्‍वासनांची अशी भली मोठी यादी भाजपने दिलेली आहे. याचा काहितरी हिशेब 2019 सालपर्यंत पुणेकरांना द्यावा लागेल. त्या दिशेने भाजपचे नेते किती गतीने वाटचाल करतात ते पहाणे महत्त्वाचे ठरेल. पंतप्रधान आवास योजनेसाठी लोकांकडून अर्ज घेतले त्याचे काय झाले असे आता लोकं विचारु लागले आहेत. मेट्रोच्या कामाचे फलक लागलेत पण, जागा संपादनाच्या नोटीसा अजून निघालेल्या नाहीत. मुठा नदी सुधारणेचे काम नेमके कोठे अडले आहे ते अजून समजलेले नाही. भाजपच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने सुचवल्याप्रमाणे स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन कामांचा आढावा घ्यायला हवा. कामाच्या स्वरुपाबद्दल मतभिन्नता असे तर ती एकत्र येऊनच मिटवायला हवी. पण, भाजपमध्ये हे घडेल का?
2018 सालात कोणत्याही निवडणुका नाहीत अशा या कोरड्या काळात पक्ष संघटनेची बांधणी करा असा सल्ला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला आहे. संघटनाबांधणीच्या जोरावरच आपण लोकसभा जिंकलो होतो त्याची आठवण दानवे यांनी करुन दिली. पुणे शहरातील पक्ष कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले हीच त्यातल्यात्यात जमेची बाजू.
– राजेंद्र पंढरपुरे