भाजपमुळे गाजरालाही लाज वाटू लागली!

0

भोसरीतील हल्लाबोल आंदोलनात अजित पवारांनी डागले सरकारवर टीकास्त्र

भोसरी : निवडणुकाच्या आधीपासून आजपर्यंत भाजपने अनेक आश्वासने दिली. मात्र, त्यांना ती पूर्ण करता आली नाहीत. या भाजपमुळे आता गाजराला स्वतःची लाज वाटायला लागली आहे. इतके हे भाजपचे फेकू सरकार आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार व भाजपवर भोसरीतील जाहीरसभेत जोरदार टीकास्त्र डागले. तसेच, देशात भाजपसाठी जशी भरती होती, तशीच ओहोटी सुरू झाली असल्याचा टोलाही त्यांनी हाणला. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने भोसरीतील गावजत्रा मैदानावर आयोजिक जाहीरसभेत पवार बोलत होते. या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार दिलीप वळसे-पाटील, विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल आदींची उपस्थिती होती. तसेच, मोठ्या प्रमाणात शहरवासीयांची गर्दी या सभेला लोटली होती.

शहरातील राजकीय गोंधळ आता तुम्हाला मान्य आहे का?
अजित पवार म्हणाले, या शहराशी अनेक वर्षे जवळकीचे नाते होते. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. महापालिका निकालाच्या वेळी जनता विकासाच्या मागे गेली नाही. जनतेने आमचा पराभव केला. शहरात होत असलेले बदल, कचरा समस्या, अनेकांचा हस्तक्षेप पिंपरी-चिंचवडकरांना मान्य आहे का? आयुक्तालयाचा निर्णय झाला, पण त्याचा उपयोग नाही. येथे दहशत असून, राज्य सरकार, पालकमंत्री पावले उचलताना दिसत नाहीत. शहराला कोणी वाली राहिलेले नाही. रस्त्यांच्या टेंडरची घाई केली गेली. कालवा समितीच्या बैठकीला फक्त पालिकेचे आयुक्त होते. तुमच्या पिण्याच्या पाण्यासाठी बैठकीला हे हजर राहू शकत नाही. भीमा कोरेगावला कायदा सुव्यवस्था सरकारने राखली नाही. तिथे निष्पाप मुलाचा बळी गेला. घरे, दुकाने जाळली. त्यामागचा मास्टरमाइंड कोण, हे कळायला पाहिजे. बैलगाडा शर्यंतीबाबत खासदार, आमदार फक्त भावनांशी खेळत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

आता तरी शरद पवारसाहेबांना ताकद द्या!
देशाचे राजकारण पवारसाहेबांच्या अवती-भवती फिरत आहे. त्यांच्यासाठी आपले आमदार, खासदार वाढले पाहिजेत. त्यासाठी राष्ट्रवादीचे घड्याळ चालले पाहिजे. शेतकर्‍यांना सरकारने उद्ध्वस्त केले. नीरव मोदी, ललित मोदी हजारो कोटी घेऊन गेले. देशात महागाई वाढली. रेशनिंगला मका देतात. जगात महाराष्ट्रात पेट्रोल महाग आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाय करण्याची गरज आहे. सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैसातून सत्ता हे समीकरण सुरू आहे. अनधिकृत बांधकामे, शास्तीकरापासून दिलासा देण्याची इच्छाशक्ती नाही. फडणवीसांना नागपूर, बापटांना पुण्याचे प्रेम आहे. बापट काहीही बोलतात. भ्रष्टाचाराने बरबटलेले, पण आव वेगळा आणतात. स्मार्ट सिटीचा पैसा किती आला? पुण्यात कमळाबाई तीन नंबरला गेली. कुठं नेऊन ठेवलाय भारत, महाराष्ट्र, पिंपरी-चिंचवड आणि भोसरी ? हा प्रश्न उपस्थित करून शिरुरची जागा आलीच पाहिजे. जेवढी ताकद द्या. फायदा तुमचाच आहे. बेजबाबदार, नाकर्ते सरकार घालवू, असा निश्चय करण्याचे आवाहनही यावेळी अजित पवारांनी शहरवासीयांना केले. याप्रसंगी चित्राताई वाघ, खा. सुप्रिया सुळे यांचेही घणाघाती भाषण झाले. या सभेला शहरवासीयांची अलोट गर्दी उसळली होती. तसेच, राष्ट्रवादीच्या नगरसेवक, पदाधिकारी यांचीही लाक्षणिक उपस्थिती होती.