पिंपरी । आषाढी वारीतील दिंडी प्रमुखांना देण्यात येणार्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदीत प्रकरणात कोणत्याही प्रकाराचा घोटाळा झाला नसल्याचे भाजपच्या राजवटीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या तत्कालीन महापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह कोणाचाही काडीचा संबध नसल्याचे समोर आले असून क्लिनचिट मिळाली आहे. तसेच शवदाहिनी खरेदी प्रकरणातदेखील दमडीचाही भ्रष्टाचार झाला नाही. तरीदेखील भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला नाहक बदनाम केले. विठ्ठल-रुक्मिणी खरेदी प्रकरणावरुन भाजपने खोटेनाटे आरोप करुन राजकारण केले. खोटारडे आरोप करणार्या भ्रष्टाचारी भाजपचा वर्षभराच्या राजवटीत भ्रष्टाचारी चेहरा जनता समोर आला आहे. राष्ट्रवादीला नाहक बदनाम करणार्या भाजपला आता सोडणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी दिला.
पिंपरी येथे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक समीर मासूळकर, डब्बू आसवाणी, राहुल भोसले, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, अर्पणा डोके, नगरसेविका वैशाली काळभोर, सुमन पवळे, माई काटे, अनुराधा गोफणे, निकिता कदम, विनया तापकीर, संगीता ताम्हाणे, सेवादलाचे अध्यक्ष आनंदा यादव आदी उपस्थित होते. शवदाहिनी खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपने विरोधात असताना राष्ट्रवादीला नाहक बदनाम केले.
आता भाजपने शवदाहिनी बसविण्यासाठी पाच कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. रावेत येथे वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणेसह गॅसवर आधारित आधुनिक शवदाहिनी बसविण्यात येणार आहे. सांगवीत शवदाहिनी बसविणाराही तोच ठेकेदार होता आणि आताही तोच ठेकेदार आहे. वर्षभरातच भाजपच्या भूमिकेत कसा बदल झाला? असा सवाल उपस्थित करत साने म्हणाले, भाजपाचा वर्षभराचा भ्रष्ट कारभार जनतेने पाहिला आहे. पदाधिकार्यांनी स्वत:चे खिसे भरण्याचे काम केले. विकासाचे एकही मोठे काम केले नाही.
केवळ मोठ्या कामाच्या निविदा
गेल्या वर्षभरात प्रभागातील छोटी-मोठी कामे देखील झाली नाहीत. केवळ मोठ्या कामाच्या निविदा काढण्याचे काम सत्ताधार्यांनी केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लागणार्या जागा पालिकेच्या ताब्यात नाहीत. तरीदेखील निविदा काढल्या आहेत. गोरगरिबांना घरे देण्यासाठी नव्हे तर भाजपच्या पदाधिकार्यांना पैसे खाण्यासाठीच ही योजना आणली आहे. समाविष्ठ गावासाठी 425 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना मंजूरी दिली. परंतु, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. जागा देखील ताब्यात नाहीत, असा आरोपही, साने यांनी केला.
नगरसेवकांना बोलू दिले जात नाही
पवना धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा प्रकल्प भाजपने बंद पाडला. तो प्रकल्प सुरु झाला असता तर आज शहरवासियांना 24 तास पाणीपुरवठा झाला असता. आता मावळात आणि पालिकेतही भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाचे काम मार्गी लावून शहरवासियांना मुबलक पाणी द्यावे, असेही साने म्हणाले. संजोग वाघेरे म्हणाले, पालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने वेळोवेळी आवाज उठविला आहे. रस्त्यावर उतरुन आंदोलने केली आहेत. महापालिका सभागृहात त्याविरोधात आवाज उठविला आहे. परंतु, पाशवी बहुमताच्या जोरावर सभागृहात आमच्या नगरसेवकांना बोलू दिले जात नाही.