भाजपला कोर्टाचा दणका; गुजरातमधील एका आमदाराचे पद रद्द !

0

अहमदाबाद : गुजरात हायकोर्टाने आज भाजपाला मोठा दणका दिला आहे. द्वारका विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार प्रभू माणेक यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता द्वारका मतदारसंघात फेरनिवडणूक होणार आहे. भाजपा आमदार प्रभू माणेक यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान द्वारका मतदार संघातून आपला उमेदावारी अर्ज भरताना चूक केली होती. यावर विरोधी पक्ष काँग्रेस उमेदवाराने आक्षेप नोंदवला होता. तसेच, याप्रकरणी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना गुजरात हायकोर्टाने प्रभू माणेक यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय देत द्वारका मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत.

एकीकडे लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम सुरु असतानाच गुजरात हायकोर्टाच्या या निर्णयामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. 2017 मध्ये झालेल्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवत सत्ता कायम राखण्यात यश मिळवले होते. मात्र, या निवडणुकीत भाजपाला काँग्रेसने चांगलीच झुंज दिल्याचे पाहायला मिळाले होते.