कथित मूर्तीखरेदी घोटाळा : संजोग वाघेरे यांनी भाजपला ठणकावले
पिंपरी-चिंचवड : आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना देण्यात येणार्या विठ्ठल- रूक्मिणी मूर्तीखरेदीत घोटाळा झाला नसल्याचा निष्कर्ष महापालिका आयुक्तांनी काढल्यानंतर या प्रकरणात महापालिकेतील भाजप सपशेल तोंडावर आपटला आहे. तसेच, भाजप पदाधिकार्यांचा खोटारडेपणा सिद्ध झाला आहे. भाजपने नागरिकांना धार्मिकतेबाबत संवेदनशील करुन खोटे नाटे बोलून राष्ट्रवादीची बदनामी केली हे स्पष्ट झाले असून, भाजप पदाधिकार्यांविरोधात राष्ट्रवादीतर्फे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी दैनिक जनशक्तिशी बोलताना दिली.
राष्ट्रवादीची नाहक बदनामी केली!
मूर्ती खरेदीतील घोटाळ्यांचा आरोप करून पिंपरी-चिंचवड भाजपने महापालिकेची सत्ता काबीज केली होती. परंतु, मूर्तीखरेदीत घोटाळा झाला नसल्याचा निष्कर्ष महापालिका आयुक्तांनी काढला आहे. याप्रकरणात आरोप करण्यात आलेले सहआयुक्त दिलीप गावडे यांना आयुक्तांनी दोषमुक्त करत सक्त समज दिली आहे. तर भांडार अधिकारी सुरेश लांडगे यांना 500 रुपये दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर दोघांची खातेनिहाय चौकशीही रद्द केली आहे. याबद्दल वाघेरे म्हणाले, मूर्तीखरेदीत घोटाळा झाला नसल्याचा निष्कर्ष महापालिका आयुक्तांनी काढल्यानंतर खरेदीत भ्रष्टाचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने नागरिकांना धार्मिकतेबाबत संवेदनशील करून खोटे बोलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाहक बदनामी केली. त्यामुळे भाजपच्या पदाधिकार्यांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. भाजपच्या खोट्या प्रचारामुळे राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे महापालिकेतील संख्याबळ कमी झाले आहे. शवदाहिनींच्या खरेदीबाबतसुद्धा अशीच परिस्थिती असून, 400 पानांचा अहवाल 1 वर्षापूर्वी तयार झाला आहे. त्यातही कोणताही आरोप सिद्ध होऊ शकला नाही, हे वास्तवतः आहे, असेही वाघेरे यांनी सांगितले.