पुणे । भारतीय जनता पक्षाला जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शुक्रवारी महापालिका भवनासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी दिली. पुणे महापालिकेतील भाजप सत्तेला 15 तारखेला सहा महिने पूर्ण होत आहेत. या सहा महिन्याच्या काळात जाहीरनाम्यात दिलेल्या कोणत्याही कामांची पूर्तता भाजपने केलेली नाही. याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन करीत आहोत असे पत्रकात म्हटले आहे.
महापालिकेत भाजपचे पदार्पण मोडतोड करून झाले. त्यांच्या पक्षांतर्गत वादात पालिकेतील पदाधिकारी कार्यालये तोडली गेली. पोलिसात गुन्हा दाखल झाला. नुकसान भरपाई देऊ, असे भाजपने जाहीर केले. किती भरपाई दिली असा सवाल विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला. भाजपचे केंद्रात तीन वर्षे सरकार आहे. पुण्यासाठी काहीही निधी दिला नाही. फक्त फसव्या घोषणा केल्या. सहा महिन्यात 24+7 पाणी योजना भाजपने धुळीला मिळवली, स्मार्ट सिटी योजना अर्धवट आहे, कर्जरोखे काढून पालिका कर्जबाजारी केली, भामा आसखेड पाणी योजना अडवून धरली याचा जाब आताच विचारायला हवा, अशी प्रतिक्रिया तुपे यांनी व्यक्त केली.
भाजपमधील अंतर्गत वाद उफाळणार?
राष्ट्रवादी आक्रमकपणे भाजपविरोधात उतरली आहे. विरोधक शांत आहेत असा एक समज पसरला होता पण आंदोलनाने तो दूर होईल. त्याच बरोबर भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून येतील, असे बोलले जाते. महापालिकेतील भाजपवर ठपका असल्याने महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ या तीन पदाधिकार्याना उत्तर द्यावे लागणार आहे. या तिघांच्या पाठीशी वरिष्ठ नेते येणार का? हा प्रश्न आहे. खासदार संजय काकडे यांनी तर महापालिकेच्या एका निर्णयावर चांगलीच आगपाखड केली होती. त्यामुळे ते अलिप्तच राहतील, अशी चिन्हे आहेत.