नाशिक । जनतेने भाजपला निवडून दिले असले तरी त्यांच्यापुढे सक्षम पर्याय नसणे हा देशाच्या लोकशाही समोरील मोठा धोका असल्याची चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. संसदीय कारकीर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने नाशिकमध्ये आयोजित दीर्घ मुलाखती निमित्ताने ते बोलत होते. काँग्रेसकडे पार्श्वभूमी आहे, अनुभव आहे आणि संच आहे, पण त्यांची सध्याची झालेली पडझड अस्वस्थ करणारी आहे. त्यांनी पुढाकार घेऊन, आमच्याशी सुसंवाद साधला तर पर्याय निर्माण होऊ शकतो असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीचा निर्वाळा देत या बैठकीत आपल्या मांडणीला सर्वांनी सहमती दर्शवल्याचे त्यांनी नमूद केले.
द्वेष पसरवू नका. राष्ट्रभक्तीच्या नावाखाली सध्या द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे अशा बाबींकडे देशातील तरुणाई आकर्षित होणे ही चिंताजनक बाब आहे. लोकहितासाठी आणि देशाच्या विकासासाठी सर्वच राजकीय पक्षांनी याबाबत धोरण निश्चित करणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.