भाजपला बदनाम करण्यासाठी प्रशासन अन् शिवसेनेने सुपारी घेतली

0

भगत बालाणींचा आरोप;सुनील महाजन यांचे आरोप बिनबुडाचे

जळगाव: आर्थिक मलिदा लाटण्यासाठी भाजपने वॉटरग्रेस कंपनीला मक्ता दिल्याचा सुनील महाजन यांचा आरोप बिनबुडाचा आहे. केवळ भाजपला बदनाम करण्यासाठी प्रशासन आणि शिवसेनेने सुपारी घेतल्याचा आरोप भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी पत्रकार परिषदेत केला.

मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन राजकीय पोळी भाजण्यासाठी मत मांडतात. सफाई मक्तेदार वॉटरग्रेसमध्ये भाजपचे काही जण भागीदार आहेत असे ते म्हणात तर त्यांनी नावे जाहीर करावे असे खुले आव्हान बालाणी यांनी महाजन यांना दिले. आमदार राजूमामा भोळे हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी वॉटरग्रेस संदर्भात कारवाईची मागणी केली आहे. मात्र सुनील महाजन हे जनतेची दिशाभूल करीत असल्याचेही बालाणी म्हणाले. ठेकेदारासोबत प्रशासन आणि शिवसेना यांचे लागेबांधे आहे. भाजपला भाजपला बदनाम करण्यासाठी प्रशासन आणि शिवसेनेने सुपारी घेतल्याचा आरोप बालाणी यांनी केला.पत्रकार परिषदेला स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा,महिला बालकल्याण समिती सभापती शोभा बारी,नगरसेवक विशाल त्रिपाटी,नवनाथ दारकुंडे,अ‍ॅड.दिलीप पोकळे,किशोर बाविस्कर, भरत सोनवणे,किशोर चौधरी उपस्थित होते.

गिरीष महाजन यांची बदनामी केल्यास खपवून घेणार नाही : कैलास सोनवणे

जळगाव शहराच्या विकासासाठी माजी मंत्री गिरीष महाजन यांनी निधी दिला. त्यांनी कधीही भेदभाव केलेला नाही. मात्र त्यांना बदनाम करण्याचा कोणी प्रयत्न करत असतील तर खपवून घेणार नाही असा इशारा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी दिला.काही जण मुद्दामहून आंदोलन करीत आहेत. साफसफाईसाठी आता तिसर्‍यांदा निविदा मागविण्यात आल्या आहेत. पर्यायी व्यवस्था झाल्यानंतर वॉटरग्रेसचा मक्ता रद्द करु असेही सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.