यवत । हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी भाजपला साथ दिली. परंतु याच भाजपाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला तीन वर्षात भाजपाने देशाचे आणि राज्याचे वाटोळे केले. भाजपापेक्षा काँग्रेस परवडली, अशी परिस्थिती जनतेवर आली आहे. अशा भाजपाला 2019 साली भांडी घासायला लावणार, अशी परखड टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.
बारामती लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी सायंकाळी दौंड तालुक्यातील केडगाव येथे संपन्न झाला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सत्यवान ऊभे, बाबासाहेब धुमाळ, रमेश कोंडे, घोसाळकर, महेश पासलकर, अनिल सोनवणे, हेमलता परदेशी आदी मान्यवरांसह पदाधिकारी व नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.नरेंद्र मोदींनी निवडणुकीत आश्वासन दिले होते की, परदेशातील काळा पैसा भारतात आणेल आणि प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करीन. परंतु 15 रुपये सुध्दा जमा झाले नाहीत. उलट देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. भाजप हा पक्ष नसून एक लुटारू आहे. निव्वळ खोटे बोलण्याचा सपाटा त्यांनी लावल्याचे राऊत यांनी सांगितले. ज्यांनी हातात भगवा घेतला तो कधीही खोटे बोलणार नाही. शिवसैनिक ओठावर आहे तेच बोलणार ही बाळासाहेबांची शिकवण आहे. शिवसेना हा सामान्य माणसाच्या रक्तातून उभी राहिली आहे, हा मजुरांचा, कामगारांचा पक्ष आहे, असे ते पुढे म्हणाले.
2019 ला शिवशाहीचे राज्य!
कर्जमाफी बाबत बोलताना राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्ज मुक्तीसाठी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिल्यावर हे सरकार जागे झाले. परंतु अद्याप कर्जमुक्ती झाली नाही. मात्र, कर्जमुक्तीच्या जाहिराती झळकल्या आहेत. 2019 साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवशाहीचे राज्य आणायचे आहे. उद्याच्या विधानसभेत 150 आमदार शिवसेनेचे असतील. त्यासाठी गेल्या 25 वर्षांचा वचपा काढण्याची संधी दौंड या मतदार संघापासून करा. आजच्या मेळाव्यात महिलांची उपस्थिती पाहता दौंडचा आमदार शिवसेनेचा असेल त्यासाठी गट – तट न पाहता आतापासूनच कामाला लागा, असा आदेश राऊत यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.