भाजपला राजस्थानचा पाहिला तिहेरी तलाक

0

शत्रुघ्न सिन्हा यांची पुन्हा स्वपक्षावर टीका

मुंबई : राजस्थानमध्ये दोन लोकसभा आणि एक विधानसभेच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. भाजपला हा मोठा झटका असून, या पराभवावर भाजपनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राजस्थान भाजपला तिहेरी तलाक देणारे पहिले राज्य बनले आहे. सगळे रेकॉर्डस तोडणारा सत्तारूढ पक्ष भाजपसाठी ब्रेकिंग न्यूज. अजमेर-तलाक, अलवर-तलाक, मांडलगड-तलाक. आमच्या विरोधकांनी चांगल्या मतांनी ही निवडणूक जिंकली. आमच्या पक्षाला जोरदार झटका दिला आहे, असे ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे. सिन्हा यांनी भाजपला सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे. देर आए दुरुस्त आए, नाहीतर हे विनाशकारी निकाल टाटा-बाय बाय करण्याचेही असू शकतात. जागे व्हा, जय हिंद!, असे त्यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘करणी’ उलटली
राजस्थान पोटनिवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाले. यामध्ये भाजपचा दारूण पराभव झाला. भाजपच्या पराभवावर करणी सेनेनेही आनंद साजरा केला आहे. जनतेने करणी सेनेच्या संघर्षाला दाद देऊन भाजपच्या विरोधात मतदान केल्याचे करणी सेनेने म्हटले आहे. तसेच भाजपचे आमदार घनश्याम तिवारी यांनीही राजस्थान निवडणुकीतील पराभवावरून भाजपला लक्ष्य केले आहे. तिवारी यांनी म्हटले आहे की, राजस्थानमधील पराभवाला नरेंद्र मोदी सरकार आणि वसुंधरा राजे सरकार जबाबदार आहे. लोकांनी राजे आणि केंद्र सरकारला शिक्षा दिली आहे.