भाजपला राष्ट्रपित्याचे इतके वावडे का?

0

‘महात्मा गांधी हे चतुर बनिया होते‘ असे उद्गार काढून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रपित्याविरुद्ध गरळ ओकली. खरे तर भाजप असो की त्यांची नागपुरी पितृसंस्था असो, या लोकांना गांधींचा आणि गांधी आडनावाचा इतका विटाळ आहे की पाहाता सोय नाही. परंतु, गांधींवर टीका करून आपण आपले अज्ञान तर उघड करतोच; शिवाय तमाम भारतीयांचा रोषही ओढावून घेतो याची जाणिव या लोकांना का राहात नाही. गांधी हे व्यक्ती नव्हते, ते या देशाची विरासत आहेत, विचार आहे आणि अस्मिता आहेत. त्यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखेच आहे. अर्थात, ही थुंकी थुंकणार्‍याच्याच तोंडावर पडते!

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची मूळ पार्श्वभूमी सर्वांना माहिती आहे. त्यांचा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल किती अभ्यास आहे ठावूक नाही; परंतु त्यांना अद्यापही जगाला कळलेला हा महात्मा कळू नये? याचे नवल वाटते. शहा हे जन्माने गुजराती आहेत आणि बापूदेखील गुजरातीच होते. आपल्याच भूमीतील या राष्ट्रपुरुषाबद्दल आपण काय बरळत आहोत, याचे भान शहा यांना नसावे, हे दुर्देव आहे. शहा यांनी इतिहास, राजकारणाची पुस्तके वाचावित. केंद्रात आणि काही राज्यांत सत्ताधारी असलेल्या भाजपसारख्या एका मोठ्या पक्षाचे आपण राष्ट्रीय अध्यक्ष आहोत, याचे भान बाळगावे. अख्खे जग ज्या महापुरुषाला वंदनीय मानते त्या महापुरुषांबद्दल गरळ ओकून आपले अज्ञान उघड करण्याचा करंटेपणा या राष्ट्रीय अध्यक्षांना शोभणारा नाही. अमित शहा हे पुस्तके वाचतात की नाही हे माहित नाही. परंतु, स्वतःचे ज्ञान वाढण्यासाठी त्यांनी आता पुस्तके, महापुरुषांची चरित्र्ये वाचायलाच हवीत. त्यांना गांधी नावाच्या युगपुरुषाबद्दल अज्ञान असणे त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी तसे चांगले नाही. ते गांधीजींना ओळखत नसावेत. म्हणूनच, ‘गांधी हा फार चतुर बनिया होता‘ असा उपमर्द करण्याची दुर्बुद्धी त्यांना झाली. त्यांना सांगावेसे वाटते, गांधी हे नाव नाही तर या देशाची संस्कृती, ओळख आणि वारसा आहेत. त्यांचा खून करूनही त्यांचे विचार मारता आले नाहीत. उलटपक्षी जीवंत गांधींपेक्षाही मृत गांधी तुमच्यासारख्या रक्ताने हात माखलेल्या लोकांसाठी जास्त खतरनाक ठरत आहेत.

छत्तीसगड राज्याच्या दौर्‍यावर असताना अमित शहा यांनी महात्मा गांधी यांच्यावर शिंतोडे उडवून घेतले. अर्थात, त्यांचा हा प्रयत्न ऐनकेनप्रकारे प्रसारमाध्यमांतून चर्चेत राहण्यासाठीचा खटाटोपच होता. कसेही करून प्राईम टाईम मिळवायचा याच उद्देशाने त्यांनी गांधीजींवर टीका केली. खरे तर टीका करण्यासाठी गांधीजींइतका सोपा नेता इतिहासात नाही. त्यांच्यावर टीका केली तरी कुणी हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरत नाही की, कुठे जाळपोळ होत नाही. ज्या झुंडांच्या विचारांत अजिबात दम नसतो, बौद्धिक दिवाळखोरी निघालेली असते तरीही लोकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायचे असते, त्या लोकांना टीका करण्यासाठी गांधी हे अगदीच सोपे पर्याय वाटत असतात. परंतु, सूर्यावर थुंकले तरी ती थुंकी आपल्याच तोंडावर पडते याची जाणिव या अक्कलशून्यांना नसते. ज्या छत्तीसगड राज्यात अमित शहा बरळले त्या राज्यात पुढीलवर्षी निवडणूक होत आहे. जीवनात वागताना हा माणूस चोवीस तांस निवडणूक रंगात वावरत असतो. प्रत्येकवेळी निवडणुकीत उभे राहिल्यागत ते बोलत असतात. रायपूर येथे बोलताना शहा म्हणाले होते, गांधी हे फार चतुर व्यापारी होते. त्यांना पुढे काय होणार हे माहित होते. म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्यानंतर तातडीने काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, काँग्रेसने तसे केले नाही. जे काम काँग्रेसने केले नाही. गांधींनीही केले नाही. तेच काम आता लोकं करत आहेत. प्रत्येक राज्यात काँग्रेसचे विसर्जन करत आहेत. काँग्रेस केवळ स्वातंत्र्य आंदोलनासाठी निर्माण केली होती. देश स्वातंत्र्य झाला आता काँग्रेसचे काम संपले, अशी राजकीय मुक्ताफळे शहा उधळत गेलेत. प्रत्येक निवडणुकीत शहा यांच्या तोंडी एकच वाक्य असते. काँग्रेसमुक्त भारत! परंतु, दुर्देवाने शहा यांचे हे स्वप्न काही राज्ये वगळता पूर्ण होऊ शकले नाही. हे स्वप्न पूर्ण होणे शक्यही नाही. स्वतः शहा हे मान्य करतात की इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्ती काँग्रेसनेच दिली. तर मग् देश काँग्रेसचे उपकार विसरेल तरी कसा? याचे भान मात्र त्यांना बोलताना राहात नाही. लोकसभा निवडणुकीत देशवासीयांनी भाजपला एकहाती सत्ता दिली आहे. तेव्हा काँग्रेसविरोधी टीका करण्यात वेळ घालविण्यापेक्षा खरे तर शहा व त्यांच्या पक्षाने कामातून आपला ठसा उमटविला पाहिजे होता. परंतु, आपली आखूड रेषा मोठी करायची सोडून ते काँग्रेसची मोठी रेषा खोडण्याचा उपद्व्याप करत आहेत. देश चुकीच्या माणसांच्या हातात दिला की काय होते, याचा अनुभव आता प्रत्येकजण घेत आहे. जनमत विरोधात आहे हे न ओळखण्याइतपत शहा दुधखुळे नाहीत. त्यामुळे या विरोधी वार्‍यांचा रोख भलतीकडेच वळविण्यासाठी शहा यांनी गांधीजींवरील टीकेचा पर्याय निवडला आहे. तो अर्थात त्यांच्यावर बुमरॅग होणारा आहे.

ज्या राज्यांत भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, त्या राज्यांत सद्या शेतकरी आंदोलनांनी पेट घेतलेला आहे. छत्तीसगडमध्ये बोलताना शहा हे विसरलेले दिसतात की, शेजारच्या मध्यप्रदेश राज्यात भाजपची सत्ता असून, तेथे आंदोलन करणार्‍या सहा शेतकर्‍यांचा भाजप सरकारने गोळ्या घालून नुकताच खून केला होता. स्वतःच्या पक्षाचे हात शेतकरी हत्येच्या रक्ताने माखलेले असताना खरे तर राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या शहा यांनी गांधीमार्गाने पापक्षालन करायला हवे होते. परंतु, पापक्षालन तर सोडाच त्यांनी गांधींवरच टीका करून आणखी पाप पदरी पाडून घेतले. काँग्रेसमधील गांधी घराणेशाहीवर ते नेहमीच टीका करत असतात. परंतु, ही टीका करताना ते हे विसरतात की, दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यांत जेथे भाजपची सत्ता आहे, तेथे तेथे भाजपनेच स्थानिक नेत्यांच्या घराणेशाहीला प्रोत्साहन दिलेले आहे. भाजपनेत्यांच्या नव्या पिढीला, त्यांच्या नातेवाईकांना केवळ पक्षात स्थानच दिले नाही तर सत्तास्थानेही त्यांच्या ताब्यात दिली. ही घराणेशाही नाही तर काय आहे? अन् ही घराणेशाही भाजपला चालते कशी? लोकसभेपासून विधानसभा आणि अगदी जिल्हा परिषदांपर्यंत पक्षाच्या नेत्यांच्या मुला-मुलींसह नातेवाईकांनाच उमेदवारी देताना आणि त्यांना निवडून आणताना ही घराणेशाही अमित शहा यांना दिसली नाही का? राहिला प्रश्न महात्मा गांधी यांना चतुर बनिया म्हणण्याचा! तर त्यातून एक बाब तर अगदीच स्पष्ट झाली आहे, भाजपच्या रक्तातच नव्हे तर अगदी डीएनएमध्येच जातीयवाद भिनलेला आहे. तो सहजासहजी त्यांच्या डोक्यातून जाणे शक्य नाही. बनिया म्हणून बापूंची जात काढताना हाच जातीयवाद अमित शहा यांच्या डोक्यात वळवळत असावा. हिंदूधर्मातील वर्णावस्था कायम ठेवण्यासाठी जी मंडळी पोटतिडकीने खटाटोप करतात त्यात भाजपची पितृसंस्था अग्रेसर आहे. त्यामुळे अख्खा देश अन् जग जेव्हा गांधी नावाच्या युगपुरुषाला बापू, महात्मा, राष्ट्रपिता म्हणते, तेव्हा हीच मंडळी या युगपुरुषाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असतात. त्यांची जात काढून हिनवत असतात, त्यांची टिंगलटवाळी करण्याची अगदी खालची पातळीही गाठत असतात.

गांधीजींच्या सत्य, अहिंसा या विचारांतच विश्वाचे कल्याण आहे, याची जाणिव आता जगाला होऊ लागली आहे. गांधी तत्वज्ञान हे भारताचा आत्मा असून, या तत्वज्ञानानेच भारत हा विश्वगुरु होऊ शकतो. कारण, गांधी तत्वज्ञान हे महावीर, बुद्ध, विवेकानंद यांच्या तत्वज्ञानाचा सारांश आहे. परंतु, भाजप आणि त्यांच्या पितृसंस्थेला सत्य आणि अहिंसा पचनी पडत नाही. कारण, या विचाराने त्यांचे कधीही भले होणारे नाही. दोन धर्म, दोन जाती एवढेच काय दोन माणसांत ते जेव्हा भेद निर्माण करून हिंसाचाराला प्रोत्साहित करतात तेव्हाच त्यांचे राजकारण यशस्वी होते. त्यांची समाजावरील पकड मजबूत राहू शकते. म्हणूनच गांधीविचार हा या लोकांसाठी एखाद्या अणूबॉम्बइतका धोकादायक असून, त्यामुळेच गांधी संपविला तसा त्यांचा विचार संपविण्याचे दिवास्वप्न ही मंडळी पाहात असतात. हे स्वप्न आचंद्र-सूर्य सत्यात उतरणारे नाही हे माहित असूनही ही मंडळी वेळोवेळी गांधींवर टीका करत राहतात. गांधींना शरीराने मारले तरी विचाराने मारता आले नाही याचे शल्य त्यांना टोचत असते. त्यामुळेच कधी कधी त्यांच्या तोंडातून काल शहांनी ओकली तशी गरळ बाहेर पडत राहते. देशाचा राष्ट्रपिता बनिया होता की एखाद्या उच्चजातीचा होता, याच्याशी या देशातील सर्वसामान्य माणसाला काहीही देणे-घेणे नाही. गांधीजींना येथील प्रत्येक माणूस राजकारणापलिकडे पाहात असतो. प्रत्येकाच्या हृदयात बापूंचे जे स्थान आहे, ते अतिउच्च असे असून, त्या स्थानावरून बापूंना खाली खेचणे अमित शहाच काय, त्यांच्या पितृसंस्थेलाही कदापि शक्य नाही. गांधी चतुर बनिया होते की नाही, हे माहित नाही. परंतु, गांधीजींच्या नादी लागू नका. ते जीवंत होते तेव्हाही तुम्ही त्यांचे काही बिघडवू शकले नाहीत. उलट त्यांच्या खुनानंतर देशात काय प्रतिक्रिया उमटल्या होत्या याचा दाहक अनुभव तुमच्या पितृसंस्थेने घेतला होता. त्यामुळे आजही मृत गांधी तुमच्यावर उलटले तर राजकारणात तुमचे दारूण पानिपत होईल, हा इशारा लक्षात घ्या!

पुरुषोत्तम सांगळे – निवासी संपादक, दैनिक जनशक्ति, पुणे