भाजपला राष्ट्रवादीचा आधार

0

बारामती । बारामती तालुक्यात दोन टप्प्यातील निवडणुकीत विकासाची विषमता अगदी स्पष्टपणे दिसून आली आहे. पहिल्या टप्प्यात जिरायती भागातील गावांचा जास्त प्रमाणात सहभाग होता. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी तेथे दुर्लक्ष केल्याचे जाणवत होते. भाजप आणि शिवसेना या दोन सत्तारूढ पक्षांच्या बारामती तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी कोणताही विरोध न करता अगदी अलगदपणे राष्ट्रवादीच्या हातात ग्रामपंचायती सोपविल्या. विकासाची विषमता दुसर्‍या टप्प्यात दिसून येत आहे. काटेवाडी, पारवडी व गुणवडी येथील ग्रामपंचायतीत भाजपच्या पदाधिकार्‍यांचे अस्तित्वच धोक्यात आल्यामुळे राष्ट्रवादीच्याच एका स्थानिक नेत्याच्या मदतीने पॅनल बनविण्यात आले आहे. हा तालुक्यातील चर्चेचा विषय झाला आहे. या तिन्ही ग्रामपंचायतीत बागायती भागातील सधन ग्रामपंचायती असून खरा कस लागत आहे.

राजकारणाचा नवा आयाम
भाजपच्या एका पदाधिकार्‍याने बोलताना सांंगितले की, आम्ही जिल्हापरिषदेला राष्ट्रवादीला मदत केली होती हे आता लपून राहीलेले नाही. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत अशाच पध्दतीने आम्हाला सहकार्य मिळत आहे. ही चूक कशी म्हणता येईल. या प्रश्‍नापर्यंत हा पदाधिकारी येऊन थांबला. गावाच्या विकासाच्या मूळ प्रश्‍नाला बगल देऊन राजकारणाचा नवा आयाम यामुळे दिसत आहे.

विकासाचे काय?
काटेवाडी ग्रामपंचायतीत तर अजबच दिसून येत आहे. एका आडनावाच्या उमेदवारावरून दुसर्‍या पॅनलमध्ये त्याच आडनावाचा उमेदवार उभा आहे. काटे विरूध्द काटे, देवकाते विरूध्द देवकाते, मासाळ विरूध्द मासाळ, भिसे विरूध्द भिसे, घुले विरूध्द घुले अशा स्वरुपाच्या लढती स्पष्टपणे दिूसन येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस मात्र गांगरून गेला आहे. या सगळ्या राजकीय समीकरणात गावाचे आणि आपल्या विकासाचे काय होणार? हा प्रश्‍न सर्व सामान्य ग्रामस्थांसमोर उभा राहीला आहे.

सरपंच पदासाठी आटापिटा
काटेवाडी येथे राष्ट्रवादीला शिवसेनेचा टेकू मिळाला आहे. तर पारवडी आणि गुणवडीमध्ये भाजपाला राष्ट्रवादीच्याच स्थानिक नेत्याचा टेकू मिळाला आहे. पारवडी येथे तर जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला नामोहरम करण्यासाठी तगड्या धनाढ्य उमेदवाराबरोबर बंडखोर उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे. या तीनही ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी आटापिटा केला जात आहे. काटेवाडी या ग्रामपंचायतीत अगदी सुरुवातीपासूनच सत्ताधारी प्रस्थापितांनी मुह मांगे दाम देत आहेत. या तीनही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धनदांडग्यांचा वावर अगदी सहजपणे दिसून येत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीला कैचीत पकडण्याचे काम राष्ट्रवादीच्याच नेत्याकडून होत असल्याचे दिसून येत आहे.